राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत ‘डूम्सडे प्लेन्स’चे उड्डाण

वॉशिंग्टन – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर येत असतानाच, अमेरिकेत दोन ‘डूम्सडे प्लेन्स’नी उड्डाण केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. अमेरिकेच्या ‘न्यूक्लिअर कमांड फ्लीट’चा भाग असणाऱ्या दोन ‘डूम्सडे प्लेन्स’नी एकाच वेळी अमेरिकेच्या हद्दीत उड्डाण करणे ही अत्यंत दुर्मिळ घटना असल्याने त्याकडे माध्यमांसह जगाचे लक्ष वेधले गेले आहे. अमेरिकेतील ‘स्ट्रॅटेजिक कमांड’च्या प्रवक्त्यांनी, सदर उड्डाण पूर्वनियोजित असल्याचा दावा केला असून राष्ट्राध्यक्षांच्या घोषणेपूर्वी ही घटना घडणे निव्वळ योगायोग होता, अशी माहिती दिली आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत 'डूम्सडे प्लेन्स'चे उड्डाणशुक्रवारी सकाळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्यासह फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची माहिती दिली. शुक्रवारी संध्याकाळी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना राजधानी वॉशिंग्टननजिक असलेल्या ‘वॉल्टर रीड मिलिटरी हॉस्पिटल’मध्ये नेण्यात आले. त्यानंतर ट्रम्प यांच्या प्रकृतीसंदर्भात प्रसारमाध्यमे व सोशल मीडियावर विविध प्रकारचे तर्क सुरू झाले होते. मात्र राष्ट्राध्यक्ष ट्रम्प व त्यांच्या डॉक्टरांनी माध्यमांकडून करण्यात आलेले दावे फेटाळले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे डॉक्टर सीन कॉन्ले यांनी, ट्रम्प यांची प्रकृती व्यवस्थित असल्याचे निवेदन प्रसिद्ध केले आहे. ट्रम्प यांनी स्वतः ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट केला असून, लवकरच व्हाईट हाऊसमध्ये परतण्यास उत्सुक असल्याचे म्हटले आहे.

ट्रम्प यांनी सोशल मीडियावरुन आपल्या संसर्गाची माहिती जाहीर करण्यापूर्वी जवळपास अर्धा तास आधी दोन ‘डूम्सडे प्लेन्स’नी उड्डाण केल्याचे उघड झाले. यातील एक विमान राजधानी वॉशिंग्टन तर दुसरे अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीनजिक आढळल्याची नोंद झाली आहे. उड्डाणादरम्यान दोन्ही ‘डूम्सडे प्लेन्स’चे ट्रान्सपॉंडर चालू ठेवण्यात आले होते. त्यामुळे जगभरातील विमान उड्डाणांची माहिती ठेवणाऱ्या गटांना त्याची नोंद करता आली, अशी माहिती या क्षेत्रातील तज्ञांनी दिली. अमेरिकेच्या संरक्षण विभागाने ही उड्डाणे पूर्वनियोजित असल्याचे निवेदन दिले असले, तरी एकाच वेळी दोन ‘डूम्सडे प्लेन्स’चे उड्डाण हे अनपेक्षित व आपत्कालीन स्थितीचे संकेत ठरतात, असा दावा विश्लेषक तसेच तज्ञांकडून करण्यात येत आहे.

राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेत 'डूम्सडे प्लेन्स'चे उड्डाणअमेरिकी संरक्षण विभागाच्या ‘न्यूक्लिअर फ्लीट’चा भाग असलेल्या ‘ई-६बी मर्क्युरी जेट्स’ना ‘डूम्सडे प्लेन्स’ म्हणून ओळखण्यात येते. ही विमाने बोइंग कंपनीच्या ‘७०७-३२० एअर लायनर’ विमानावर आधारलेली आहेत. अणुयुद्ध किंवा इतर कोणत्याही टोकाच्या आपत्कालीन स्थितीत अनेरिकेच्या ‘न्यूक्लिअर फोर्स’शी संपर्क साधून त्यांना हल्ल्याचे आदेश देण्याची जबाबदारी या ‘डूम्सडे प्लेन्स’वर आहे. ९८२ किलोमीटर्स प्रति तास असा वेग असणारी ही विमाने १२ हजार किलोमीटर्सहून अधिक प्रवास करू शकतात. ‘रिफ्युएलिंग टँकर’च्या सहाय्याने तीन दिवस उड्डाण करण्याची क्षमता या विमानांमध्ये आहे. अमेरिकी नौदलाकडे एकूण १६ ‘डूम्सडे प्लेन्स’ असल्याचे सांगण्यात येते.

अमेरिकेत पुढील महिन्यात राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक आहे. त्याचवेळी विद्यमान राष्ट्राध्यक्ष व उमेदवार ट्रम्प यांना कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर शत्रूदेश अमेरिकेविरोधात कारवाईचे पाऊल उचलण्याची शक्यता गृहीत धरून, या देशांना अमेरिकेच्या सामर्थ्याची जाणीव करून देण्यासाठी ‘डूम्सडे प्लेन्स’च्या उड्डाणाची मोहीम आखण्यात आली असावी, असा दावाही विश्लेषकांकडून करण्यात आला आहे.

leave a reply