युएई रशियाकडून ५०० हेलिकॉप्टर्स खरेदी करणार

- सुपरसोनिक विमानाच्या संयुक्त निर्मितीचाही समावेश

दुबई/मॉस्को – संयुक्त अरब अमिरात’ने (युएई) आपल्या पोलीस दलासाठी रशियाकडून ५०० हेलिकॉप्टर्सच्या खरेदीचा करार केला आहे. या खरेदी व्यवहाराबरोबरच रशियन कंपनी युएईमध्ये आपला निर्मिती प्रकल्प देखील उभारणार आहे. यामुळे उभय देशांमधील लष्करी सहकार्याला नवी गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो. तीन आठवड्यांपूर्वी अमेरिकेने युएईबरोबरील संरक्षण सहकार्य रोखले होते. या पार्श्‍वभूमीवर, युएई व रशियातील या सहकार्याकडे पाहिले जाते.

युएई स्थित ‘तवझून’ आणि रशियाच्या ‘व्हिआर-टेक्नोलॉजिज्’ (व्हिआरटी) या दोन कंपन्यांमध्ये हेलिकॉप्टर्सच्या खरेदीबाबतचा करार पार पडला. तब्बल ४४ कोटी डॉलर्सच्या या करारांतर्गत रशियन कंपनी युएईच्या पोलिसांसाठी ५०० ‘व्हिआरटी-५००’ हेलिकॉप्टर्सची खरेदी करणार आहे. त्याचबरोबर ‘व्हिआरटी-३००’ या ड्रोन हेलिकॉप्टर्सच्या खरेदीबाबतही युएई विचार करीत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. हेलिकॉप्टर्सच्या खरेदीबरोबरच युएईने रशियन कंपनीतील ५० टक्के भांडवलाची खरेदी केली आहे.

यामुळे रशियन कंपनी युएईमध्ये आपला नवा निर्मिती प्रकल्प उभारणार आहे. या प्रकल्पात युएई हेलिकॉप्टर्स तसेच ड्रोन्सची निर्मिती करणार आहे. येत्या मे महिन्यापर्यंत यासंबंधीचे महत्त्वाचे निर्णय घेतले जातील. तसेच लवकरच हेलिकॉप्टर्सची निर्मिती देखील सुरू होईल. या हेलिकॉप्टर्सच्या व्यतिरिक्त युएई आणि रशियामध्ये सुपरसोनिक जेट विमानाच्या संयुक्त निर्मितीसाठी हालचाली सुरू आहेत. रशियाची ‘युनायटेड एविएशेन कॉर्पोरेशन’ आणि युएईच्या ‘मुबादाला’ यांच्यात प्रवासी सुपरसोनिक जेट विमानाच्या निर्मितीबाबत चर्चा सुरू आहे. या वर्षअखेरीपर्यंत सदर विमानाचे दोन प्रकारातील डिझाईन जगासमोर मांडण्यात येईल. आठ आणि तीस प्रवाशांची सोय असलेल्या अशा दोन विमानांची निर्मिती करण्यात येणार आहे. १.५ ते १.८ मॅक वेगाने उड्डाण करणार्‍या या प्रवासी विमानाची निर्मिती वर्षभरात सुरू होणार आहे.

रशिया आणि युएईमध्ये पाच दशकांपासून राजनैतिक संबंध आहेत. पण अमेरिकेबरोबरच्या मैत्रीपूर्ण संबंधांमुळे युएईने रशियाबरोबर लष्करी सहकार्य प्रस्थापित केले नव्हते. तरीही २०१५ सालच्या सिरियातील रशियाच्या लष्करी हालचालींना युएईने जाहीर पाठिंबा दिला होता. त्याचबरोबर युक्रेनबरोबरच्या संघर्षामुळे पाश्‍चिमात्य देशांनी रशियावर लादलेले निर्बंध मागे घ्यावे, अशी मागणी करणार्‍यांमध्ये इस्रायल, सौदी अरेबियाबरोबर युएईचा देखील समावेश होता.

महिन्याभरापूर्वी अमेरिकेचे तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युएईला ‘एफ-३५’ अतिप्रगत लढाऊ विमाने पुरविण्याचे जाहीर केले. पण बायडेन यांनी अमेरिकेची सूत्रे हाती घेताच युएईबरोबरील सर्व लष्करी सहकार्यांवर तात्पुरती बंदी जाहीर केली. यावर संताप व्यक्त करत युएईने रशियाकडून लढाऊ विमाने खरेदी करण्याचा इशारा अमेरिकेला दिला होता.

leave a reply