बायडेन सत्तेवर येण्याच्या आधी अमेरिका-चीन संघर्ष भडकेल

- चीनच्या अभ्यासगटाचा इशारा

बीजिंग – ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात अमेरिका-चीन संघर्ष पेटू शकतो. राष्ट्राध्यक्ष नियुक्त ज्यो बायडेन अमेरिकेची सत्तासूत्रे हाती घेण्याआधी हा संघर्ष भडकेल, असा इशारा ‘साऊथ चायना सी प्रोबिंग इनिशिएटिव्ह’ (एससीएसपीआय) या चिनी अभ्यासगटाने दिला आहे. दरम्यान, अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष बायडेन होणार असले तरी यामुळे सुखावून जाण्याचे कारण नाही. चीनच्या विस्तारवादाला रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वीकारलेली धोरणे बायडेन यांच्या काळात अधिकच तीव्र होतील, असा आणखी एक इशारा हाँगकाँगस्थित वृत्तसंस्थेने दिला आहे.

अमेरिका-चीन

‘साऊथ चायना सी’मधील घडामोडींचा अभ्यास करून त्याबाबत चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला माहिती पुरविण्याचे काम ‘एससीएसपीआय’कडे आहे. काही दिवसांपूर्वी या चिनी अभ्यासगटाने अमेरिकेतील आघाडीच्या साप्ताहिकाला ‘साऊथ चायना सी’बाबत महत्त्वाची माहिती पुरविली होती. या सागरी क्षेत्रात अमेरिका आणि चीनमध्ये आकस्मिक संघर्षाचा धोका बळावल्याचे चिनी अभ्यासगटाला वाटत आहे, असा दावा अमेरिकी साप्ताहिकाने केला.

‘साऊथ चायना सी’तील घडामोडींबाबत माध्यमांमध्ये दैनंदिन पातळीवर बातम्या प्रसिद्ध होत नसल्या, तरी या सागरी क्षेत्रात अमेरिका आणि चीनचे नौदल दररोज एकमेकांसमोर खडे ठाकत असते. त्यामुळे या संघर्षाचा धोका अधिकच वाढला आहे’, असे चिनी अभ्यासगटाच्या हवाल्याने अमेरिकी साप्ताहिकाने सांगितले. त्याचबरोबर या क्षेत्रातील वाद सोडविण्यासाठी ‘एससीएसपीआय’ने आवाहन केले आहे. ‘अमेरिका व चीनने हे संकट टाळण्यासाठी वेळीच योजना आखल्या नाही तर मोठा अपघात किंवा दारूण संघर्ष भडकण्याचा धोका आहे’, असा इशारा या अभ्यासटाने दिला.

अमेरिका व चीनमधील संघर्षाचा धोका वाढलेला असताना यातून माघार घेणे अवघड असल्याची चिंता चिनी अभ्यासटाने व्यक्त केली. ‘साऊथ चायना सी’मधील संघर्ष टाळायचा असेल तर अमेरिकेने पुढाकार घ्यावा, असे ‘एससीएसपीआय’ने सुचविले. येथील सागरी क्षेत्र आणि द्विपसमुहांच्या वादात अमेरिकेने कुणाही देशाची बाजू घेऊ नये. या क्षेत्रातील समतोल राखण्यासाठी सहाय्य करावे आणि अमेरिकेने या क्षेत्रातील लष्करी आक्रमकता सोडून द्यावी, असे आवाहन चिनी अभ्यासगटाने केले.

मात्र अमेरिका ‘साऊथ चायना सी’मधून माघार घेण्याची शक्यता नाही, असे सांगून ‘एससीएसपीआय’ने सदर क्षेत्रातील तणावासाठी अप्रत्यक्षरित्या अमेरिकाच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प सत्ता सोडण्याआधी ‘साऊथ चायना सी’ क्षेत्रात संघर्ष छेडतील, असा दावा चिनी अभ्यासगट करीत आहे. तर हाँगकाँगस्थित प्रसिद्ध वृत्तसंस्थेने चीनच्या कम्युनिस्ट राजवटीला ज्यो बायडेन यांच्या नव्या प्रशासनाकडून सावध राहण्याची आवश्यकता असल्याचे बजावले आहे.

काही दिवसांपूर्वी नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदासाठी ‘जेक सुलिवॅन’ यांच्या नावाची घोषणा केली होती. गेल्या वर्षी ‘साऊथ चायना सी’मधील चीनच्या आक्रमकतेच्या विरोधात सुलिवॅन यांनी जोरदार टीका केली होती. तसेच ट्रम्प प्रशासन या सागरी क्षेत्रात चीनला रोखण्यात अपयशी ठरत असल्याचा आरोप सुलिवॅन यांनी केला होता.

‘‘या सागरी क्षेत्रातील वाहतुकीच्या स्वातंत्र्यासाठी व आपल्या मित्रदेशांच्या सुरक्षेसाठी अमेरिकेने ‘साऊथ चायना सी’मध्ये अधिकाधिक तैनाती करावी’, असे सुलिवॅन यांनी सुचविले होते.

त्याचबरोबर अमेरिकेने चीनविरोधातील सागरी वाहतुकीच्या स्वातंत्र्याची मोहीम तीव्र करावी, असे सुलिवॅन यांनी म्हटल्याची आठवण हाँगकाँगस्थित वृत्तसंस्थेने करुन दिली. त्यामुळे सुलिवॅन यांची निवड करून बायडेन यांनी आपले ‘साऊथ चायना सी’ धोरण ट्रम्प यांच्यापेक्षाही आक्रमक असेल, असे स्पष्ट संकेत दिले आहेत, असा इशारा सदर वृत्तसंस्थेने दिला आहे.

leave a reply