अमेरिकेची आण्विक पाणबुडी पर्शियन आखातात दाखल

- इस्रायलच्या पाणबुडीने सुएझ कालवा पार केला

आण्विक पाणबुडीवॉशिंग्टन – १५४ टॉमाहॉक क्रूझ् क्षेपणास्त्रांनी सज्ज असलेली अमेरिकेची ‘युएसएस जॉर्जिया’ आण्विक पाणबुडी पर्शियन आखातात दाखल झाली आहे. या पाणबुडीने होर्मुझचे आखात पार केल्याची घोषणा अमेरिकेच्या नौदलाने केली. इराणबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन पाणबुडीची पर्शियन आखातातील ही तैनाती लक्षवेधी ठरते. दरम्यान, इस्रायलनेही आपली पाणबुडी सुएझ कालव्यातून ‘रेड सी’च्या दिशेने रवाना केल्याची बातमी इस्रायली वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केली आहे.

अमेरिकेच्या नौदलात ‘ओहिओ’ श्रेणीतील चार पाणबुड्या आहेत. इतर देशांच्या पाणबुड्यांच्या तुलनेत ‘ओहिओ’ श्रेणीतील पाणबुड्या सर्वाधिक युद्धसज्ज मानल्या जातात. बॅलेस्टिक अण्वस्त्रांचा हल्ला चढविण्याची क्षमता या पाणबुड्यांमध्ये आहे. अमेरिकी नौदल अतिशय महत्त्वाच्या मोहिमांसाठी या पाणबुड्यांना रवाना करते. ‘युएसएस जॉर्जिया’ देखील याच ‘ओहिओ’ श्रेणीतील पाणबुडी आहे. आठ वर्षानंतर पहिल्यांदा ‘युएसएस जॉर्जिया’ पर्शियन आखातात दाखल झाली आहे.

आण्विक पाणबुडी

अमेरिकेच्या नौदलाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, रविवारी या पाणबुडीने ‘युएसस पोर्ट रॉयल’ आणि ‘युएसएस फिलिपाईन्स सी’ या विनाशिकांसह होर्मुझच्या आखातातून प्रवास केला. याची माहिती सोमवारी जाहीर करण्यात आली. या क्षेत्रातील अमेरिकेच्या सागरी वाहतुकीच्या सुरक्षेसाठी ‘युएसएस जॉर्जिया’ व सहाय्यक विनाशिकांना रवाना केल्याचे अमेरिकेच्या पाचव्या आरमाराच्या वरिष्ठ अधिकार्‍याने स्पष्ट केले. पर्शियन आखातात दाखल होण्याआधी अमेरिकन पाणबुडी सप्टेंबर महिन्यापर्यंत हिंदी महासागरातील अमेरिकेच्या ‘दिएगो गार्सिया’ बेटाच्या क्षेत्रात तैनात होती.

अमेरिकेची आण्विक पाणबुडी किती महिन्यांसाठी पर्शियन आखातात तैनात असेल, हे स्पष्ट होऊ शकलेले नाही. गेल्या काही आठवड्यांमध्ये अमेरिकेने या क्षेत्रातील हालचाली वाढविल्या आहेत. दहा दिवसांपूर्वी अमेरिकेने अण्वस्त्रवाहू ‘बी-५२’ बॉम्बर विमाने आखातात तैनात केली होती. इराणच्या धोकादायक हालचालींच्या पार्श्‍वभूमीवर या बॉम्बर विमानांची तैनाती करीत असल्याचे अमेरिकेने जाहीर केले होते. त्याआधी अमेरिकेची ‘युएसएस निमित्झ’ ही विमानवाहू युद्धनौका ओमानचे आखात आणि हिंदी महासागराच्या मध्यावर तैनात होती.

आण्विक पाणबुडी

कुद्स फोर्सेसचे प्रमुख कासेम सुलेमानी यांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी इराण अमेरिकी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांच्या हत्या घडविण्याची धमकी देत आहे. रविवारी रात्री इराकमधील अमेरिकेच्या दूतावासावर रॉकेट हल्ले देखील झाले. या हल्ल्यासाठी इराणसंलग्न दहशतवादी संघटना जबाबदार असल्याचा आरोप अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री माईक पॉम्पिओ यांनी केला. इराण व इराणसंलग्न दहशतवादी संघटनांच्या या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, अमेरिका इराणच्या हल्ल्याला उत्तर देण्यासाठी तयार असल्याची घोषणा अमेरिकेच्या ‘सेंटकॉम’चे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी काही तासांपूर्वीच केली होती.

तर अमेरिकेच्या संरक्षणदलाचे प्रमुख जनरल मार्क मिले यांनी देखील गेल्या आठवड्यात सौदी अरेबिया, संयुक्त अरब अमिरात आणि इस्रायल या देशांचा गोपनीय दौरा केला होता. अमेरिकेच्या लष्करी अधिकार्‍यांचे या क्षेत्रातील दौरे तसेच बॉम्बर्स विमाने आणि पाणबुड्यांची येथील तैनाती निराळे संकेत देत आहेत.

दरम्यान, अमेरिकेने पर्शियन आखातात आण्विक पाणबुडी रवाना केल्याची घोषणा केल्यानंतर, पुढच्या काही तासात इस्रायलच्या वृत्तवाहिनीने बातमी प्रसिद्ध केली. गेल्या आठवड्यात इस्रायली पाणबुडीने सुएझचा कालवा पार करून ‘रेड सी’च्या क्षेत्रात प्रवेश केल्याचा दावा इस्रायली वृत्तवाहिनीने केला. इस्रायली पाणबुडीच्या या प्रवासासाठी इजिप्तच्या सरकारने परवानगी दिली होती, असे या वृत्तवाहिनीने म्हटले आहे. इस्रायलच्या लष्कराने यावर बोलण्याचे टाळले आहे.

leave a reply