अमेरिकेने अफगाणिस्तानमध्ये सोडलेली शस्त्रे व उपकरणे जम्मू-काश्मीरमध्ये सापडली

- लष्करी अधिकार्‍याची माहिती

बारामुल्ला – गेल्यावर्षी अमेरिकेचे सैन्य अफगाणिस्तानातून माघारी गेल्यावर अमेरिकेचा प्रचंड मोठा शस्त्रसाठा व अत्याधुनिक उपकरणे दहशतवाद्यांच्या हाती लागली होती. ही शस्त्रे नियंत्रण रेषेवरून जम्मू-काश्मीरच्या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचली आहेत. काश्मीरमध्ये चकमकीत ठार करण्यात आलेल्या काही दहशतवाद्यांजवळून ही शस्त्रे सापडली आहेत, अशी माहिती लष्करी अधिकार्‍याने उघड केली आहेत. अफगाणिस्तानात दहशतवाद्यांच्या हाती लागलेली शस्त्रे भारताविरोधात वापरली जातील, असा इशारा तज्ज्ञांनी त्यावेळीच दिला होता.

गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात अफगाणिस्तानातून सैन्यमाघारीनंतर तेथेल अमेरिकेच्या तळावर मागे राहिलेला प्रचंड मोठा शस्त्रसाठा व अत्याधुनिक उपकरणे दहशतवाद्यांनी लुटली होती. ही शस्त्रे घेऊन दहशतवादी जल्लोष करतानाचे फोटो व व्हिडीओ त्यावेळी व्हायरल झाले होते. यासंदर्भातील एका अहवालानुसार अमेरिकेची सुमारे ८० अब्ज डॉलर्सची शस्त्रे, उपकरणे व लष्करी साधने अफगाणिस्तानात मागे राहिल्याचा दावा केला जातो. सुमारे सहा लाख अत्याधुनिक एम१६, एम२४९, एम४सारख्या रायफली, छोटी शस्त्रे, एक लाख ६१ हजार दूरसंचार उपकरणे, हजारो नाईट व्हिजन गॉगल्स दहशतवाद्यांच्या हाती लागल्याचा अहवाल आहे.

तालिबान्यांनी या शस्त्रांचा बाजार मांडल्याचे आणि तेथून ही शस्त्रे पाकिस्तानी दहशतवाद्यांनी खरेदी करून पाकिस्तानात पाठविल्याचे दावे समोर आले होते. तसेच पाकिस्ताननेही मोठ्या प्रमाणावर तालिबान्यांकडून ही अमेरिकी शस्त्रे घेतल्याच्या बातम्या आल्या होत्या. तसेच या शस्त्रांचा वापर भारताविरोधात होईल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला होता.

अफगाणिस्तानात अमेरिका व नाटो फौजांविरोधात केवळ तालिबान लढत नव्हते, तर जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा यासारख्या भारतविरोधी कारवाया करणार्‍या पाकिस्तानी दहशतवादी संघटनांचे दहशतवादीही यामध्ये सहभागी असल्याचे अहवाल आले होते. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अहवालातही याचा उल्लेख होता. अफगाणिस्तानचा संघर्ष संपल्यावर हे दहशतवादी पुन्हा काश्मीरकडे येतील, अशी भिती त्यावेळी तज्ज्ञांनी व्यक्त केली होती. तसेच तालिबानने अमेरिकेच्या सैन्य माघारीनंतर अनेक दहशतवाद्यांना जेलमधून मुक्त केले होते. यातील कित्येक दहशतवादी आता अफगाणिस्तानातून लुटलेल्या अमेरिकी शस्त्रांसह सध्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) तळ ठोकून आहेत व घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत, असा दावा केला जातो.

जम्मू-काश्मीरमधील लष्कराच्या १९ इन्फंट्री डिव्हिजनचे जनरल ऑफीसर कमांडिंग (जीओसी) मेजर जनरल अजय चांदपुरीया यांनी सध्या १०० ते १३० दहशतवादी पीओकेमधील लॉन्चपॅडवर असल्याचा गुप्तचर यंत्रणेच्या हवाल्याने सांगितले. शंभरहून अधिक अफगाणी सीमकार्ड पीओकेमध्ये सक्रीय दिसून आल्याची माहिती मेजर जनरल अजय चांदपुरीया यांनी दिली. पाकिस्तानी दहशतवादी अमेरिकेने मागे ठेवलेली शस्त्रे व उपकरणे वापरत आहेत. गेल्या काही महिन्यात जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी ठार केलेल्या काही दहशतवाद्यांजवळ अमेरिकी रायफली आणि नाईट व्हिजन गॉगल आढळले आहेत, असे मेजर जनरल अजय चांदपुरीया यांनी अधोरेखित केले.

पाकिस्तानमार्गे ही शस्त्रे अफगाणिस्तानातून एलओसीपर्यंत पोहोचली आहेत. येणार्‍या उन्हाळ्यात अफगाणिस्तानातून पीओकेमध्ये आलेले दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न करू शकतात, असे मेजर जनरल चांदपुरीया म्हणाले. तसेच पाकिस्तानी लष्कराकडूनच या दहशतवाद्यांना अफगाणिस्तानातून काश्मीरकडे पाठविले जात असल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.

लष्कराचे दोन जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या शोपियानमध्ये झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले, तर चकमकीदरम्यान लष्कराच्या दोन जवानांना वीरमरण आले.

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील झैनपोरा भागात काही दहशतवादी लपल्याची निश्‍चित माहिती सुरक्षादलांच्या जवानांना मिळाली होती. त्यानंतर या भागात शोधमोहिम हाती घेण्यात आली. सुरक्षादलांची ही शोधमोहिम सुरू असतानाच ही चकमक उडली. दहशतवाद्यांनी सुरक्षादलांच्या दिशेने अचानक गोळीबार सुरू केला. यामध्ये लष्कराचे दोन जवान चकमकीत शहीद झाले.

तर चकमकीत एक दहशतवादी ठार झाला. या दहशतवाद्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तर या भागात आणखी काही दहशतवादी असण्याची शक्यता असून शोधमोहिम सुरू आहे.

leave a reply