अमेरिका, इस्रायल संयुक्तपणे लेझर सुरक्षा यंत्रणा विकसित करणार

लेझरतेल अविव – अमेरिकेकडे थाड, पॅट्रियॉट, एजिस अशी प्रगत हवाई सुरक्षा यंत्रणा आहेत. तर इस्रायल आयर्न डोम, ॲरो, डेव्हिड्स स्लिंग अशा त्रिस्तरीय हवाई सुरक्षा यंत्रणेने सज्ज आहे. पण आता शत्रूची क्षेपणास्त्रे भेदणारी लेझर यंत्रणा विकसित करण्यासाठी अमेरिका व इस्रायल एकत्र आले आहेत. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन आणि इस्रायलचे पंतप्रधान येर लॅपिड यांनी या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. दरम्यान, अमेरिका व इस्रायल ही लेझर यंत्रणा येत्या काळात आपल्या सहकारी देशांनाही पुरवू शकतात, अशी लक्षवेधी घोषणा पंतप्रधान लॅपिड यांनी केली आहे.

चार दिवसांपूर्वी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन यांनी इस्रायलचा दौरा केला होता. यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इस्रायलच्या ‘डिफेन्स टेक’ला भेट दिली. यामध्ये इस्रायलच्या संरक्षणदलात असलेल्या प्रगत तसेच अतिप्रगत हवाई सुरक्षा यंत्रणेची राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी पाहणी केली. यामध्ये ‘आयर्न बीम’चा देखील समावेश होता. यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन आणि पंतप्रधान लॅपिड यांनी या संरक्षण सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

यानुसार अमेरिका व इस्रायल संयुक्तरित्या लेझर सुरक्षा यंत्रणा विकसित करतील. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारीत ही लेझर यंत्रणा असेल, असे दोन्ही नेत्यांनी जाहीर केले. अत्युच्च ऊर्जेवर आधारीत लेझर यंत्रणा येत्या काळात इस्रायलच्या हवाईहद्दीबरोबरच अमेरिका तसेच इस्रायलच्या सहकारी देशांच्या हवाईहद्दीचीही सुरक्षा करील, असे पंतप्रधान लॅपिड म्हणाले. थेट उल्लेख केला नसला तरी अब्राहम करार केलेल्या युएई, बाहरिन तसेच इस्रायलच्या इतर सहकारी देशांकडे पंतप्रधान लॅपिड लक्ष वेधत असल्याचे माध्यमांचे म्हणणे आहे.

लेझरही नवी लेझर यंत्रणा इस्रायलने याआधीच विकसित केलेल्या ‘आयर्न बीम’वर आधारीत असण्याची शक्यता वर्तविली जाते. यासाठी अमेरिका व इस्रायलकडे असलेल्या लेझर यंत्रणेची उदाहरणे इस्रायली माध्यमे देत आहेत. लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रे भेदण्यासाठी अमेरिकेने लेझर यंत्रणा विकसित केली असून सध्या त्याची चाचणी सुरू आहे. यामध्ये जमिनीवरुन मोबाईल व्हॅनद्वारे वापरल्या जाणाऱ्या लेझर यंत्रणेचा समावेश आहे. या तुलनेत इस्रायलची ‘आयर्न बीम’ ही लेझर यंत्रणेची चाचणी पूर्ण झाली आहे. इस्रायलचे सरकार पुढच्या वर्षी आयर्न बिम गाझापट्टीच्या सीमेजवळ तैनात करणार आहे.

दरम्यान, इस्रायलची आयर्न डोम ही जगातील सर्वात यशस्वी आणि लघु पल्ल्याची रॉकेट्सच्या विरोधात भेदक हवाई सुरक्षा यंत्रणा म्हणून ओळखली जाते. तर आयर्न बीम ही अचूक, भेदक आणि आर्थिक आघाडीवर परवडणारी लेझर यंत्रणा म्हणून समोर येत आहे. काही महिन्यांपूर्वी इस्रायलने आयर्न बिमची यशस्वी चाचणी घेतली होती. गाझापट्टीतील हमास, इस्लामिक जिहाद तसेच लेबेनॉनमधील हिजबुल्लाहचा वाढता धोका लक्षात घेता, इस्रायलचे सरकार 2023 सालापासूनच आयर्न बीम कार्यान्वित करणार आहे.

leave a reply