अमेरिका कोरोनाव्हायरसचे पुढचे केंद्र ठरू शकते – जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

वॉशिंगटन अमेरिका कोरोनाव्हायरसच्या साथीचे जागतिक केंद्र ठरू शकतेअसा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) दिला. जगभरात थैमान घालणार्या कोरोनाव्हायरसने अमेरिकेत ५८२ जणांचा बळी घेतला असून ४६,१६८ जणांना ह्याची लागण झाली आहे. गेल्या चोवीस तासात १११ जणांचा बळी व १०,९६८ नवे रूग्ण समोर आल्यानंतर ‘डब्ल्यूएचओ’ने अमेरिकेला हा गंभीर इशारा दिला.

‘या साथीचा फैलाव पाहता, येत्या काळात अमेरिका या विषाणूचे नवे केंद्र ठरेल’, असे डब्ल्यूएचओ’च्या वरिष्ठ अधिकार्याने अमेरिकी वर्तमानपत्राला सांगितले. या साथीचा सामना करीत असताना अमेरिकेला वेन्टिलेटर्स तसेच इतर आवश्यक वैद्यकीय साहित्याची टंचाई भासत आहे. याची दखल घेऊन अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकी कंपन्यांना वेन्टिलेटर्स तसेच आवश्यक वैद्यकीय साहित्याच्या निर्मितीचे आदेश दिले आहेत. फोर्ड, जनरल मोटर्स आणि टेस्ला या नामांकीत कंपन्यांना युध्दपातळीवर हे काम करण्याची सूचना केली आहे.

कोरोनाव्हायरसची साथ रोखण्यासाठी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी १.८ ट्रिलियन डॉलर्सचे अर्थसहाय्य घोषित केले होते. पण ह्याला अमेरिकन कॉंग्रेसची मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे यावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षामध्ये तीव्र मतभेद झाल्याचे दिसत आहे. तर अमेरिकन लष्कर ही साथ रोखण्यासाठी सक्रिय झाले असून काही हॉटेल्स व रेस्टॉरंटचे अमेरिकी लष्कराने हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले आहे.

leave a reply