अमेरिका-तैवान सहकार्याने अस्वस्थ झालेल्या चीनकडून तैवानवरील दडपण वाढविण्याचे प्रयत्न

अस्वस्थबीजिंग/वॉशिंग्टन – अमेरिका तैवानबरोबरील सहकार्य अधिकाधिक भक्कम करण्यासाठी वेगाने पावले उचलत असल्याने चीन चांगलाच अस्वस्थ झाल्याचे समोर येत आहे. याच अस्वस्थेतून चीनने तैवानवरील दडपण वाढविण्यासाठी  व्यापक लष्करी हालचाली सुरू केल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात चीनने तैवानच्या हवाईहद्दीत तब्बल 26 वेळा घुसखोरी केल्याचे उघड झाले. त्यापाठोपाठ चीनने आपल्या नव्या ‘स्टेल्थ बॉम्बर’ तसेच प्रगत ‘हायपरसोनिक इंजिन’ची माहितीही प्रसिद्ध केली आहे. या हालचाली तैवानविरोधातील दबावतंत्राचा भाग असल्याचा दावा विश्‍लेषकांकडून करण्यात आला आहे.

गेल्या वर्षभरात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी तैवानबरोबरील सहकार्याच्या मुद्द्यावर अधिक सक्रीय भूमिका घेतली आहे. तैवानला मोठ्या प्रमाणात संरक्षण सहकार्य पुरविणाऱ्या अमेरिकेने राजनैतिक तसेच व्यापारी स्तरावरही हालचालींना वेग दिला आहे. गेल्या चार महिन्यात अमेरिकेच्या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तैवानला भेट दिली आहे. त्यात परराष्ट्र विभाग व संरक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसह आरोग्यमंत्र्यांचाही समावेश आहे. त्याचवेळी अमेरिका व तैवानमध्ये काही महत्त्वपूर्ण करारही झाले असून त्यात चीनच्या प्रभावाला शह देणाऱ्या ‘इन्फ्रास्ट्रक्चर डील’चाही समावेश आहे.

अस्वस्थ

या कराराच्या आधारे आग्नेय आशियासह लॅटिन अमेरिकेतील पायाभूत सुविधांचा विकास करण्यासाठी अमेरिका व तैवानने एकत्र येण्यास सुरुवात केली आहे. येत्या वर्षभरात संयुक्त प्रकल्पाला सुरुवात होईल, असे संकेत तैवानच्या वरिष्ठ मंत्र्यांनी नुकतेच दिले आहेत. ‘ग्लोबल सप्लाय चेन’मध्ये असलेले चीनचे वर्चस्व मोडून काढण्यासाठी पर्यायी व्यवस्था उभारण्यासाठी प्रयत्न चालू झाल्याचे संकेतही तैवानने दिले आहेत. हे सुरू असतानाच अमेरिकेच्या संसदेत तैवानबरोबर व्यापारी करार करण्याची तसेच तैवानमधील अमेरिकेच्या प्रतिनिधींना अधिकृत पातळीवर राजदूताचा दर्जा देण्याची मागणी जोर धरत आहे. अमेरिकेतील संसदीय आयोगाने यासंदर्भात शिफारस केल्याचे वृत्तही प्रसिद्ध झाले आहे.

अस्वस्थदरम्यान, अमेरिकेच्या मरिन्सचे पथक तैवानच्या लष्कराला प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या महिन्यात तैवानमध्ये दाखल झाल्याचीही माहिती समोर आली आहे. अमेरिकी लष्कराकडून अशा रितीने तैवानला उघड लष्करी प्रशिक्षण देण्याची गेल्या चार दशकातील ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येते. अमेरिका-तैवानमधील या वाढत्या सहकार्याच्या घटनांनी चीन जबरदस्त अस्वस्थ झाला असून तैवानवर सातत्याने दडपण वाढविण्याचे प्रयत्न करीत आहे.

नोव्हेंबर महिन्यात चीनच्या लढाऊ विमानांनी तैवानच्या हद्दीत घुसखोरी करण्याचे प्रमाण वाढविल्याचे उघड झाले आहे. चीनच्या लढाऊ विमानांनी 26 वेळा तैवानच्या हवाईहद्दीचे उल्लंघन केल्याची माहिती प्रसिद्ध झाली आहे. चीनच्या लष्करी सूत्रांकडूनच ही माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ चीनने आपल्या नव्या प्रगत ‘स्टेल्थ बॉम्बर’ची माहिती प्रसिद्ध केली असून हे बॉम्बर पॅसिफिक महासागरातील अमेरिकेच्या तळांना लक्ष्य करण्याची क्षमता ठेवते, असा दावा केला आहे. हा दावा अमेरिकेचे सहाय्य घेणाऱ्या तैवानवर दबाव वाढविण्याच्या धोरणाचा भाग असल्याचे विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

leave a reply