अमेरिका आखातातून विमाने, क्षेपणास्त्र यंत्रणा मागे घेत आहे – अमेरिकी वर्तमानपत्राचा दावा

वॉशिंग्टन – अमेरिका आखाती देशांमध्ये तैनात केलेली लढाऊ विमाने आणि प्रगत क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा मागे घेणार आहे. बदलत्या लष्करी धोरणांच्या पार्श्‍वभूमीवर हे पाऊल उचलले जात असल्याचा दावा अमेरिकेतील वर्तमानपत्राने केला. चीनच्या वाढत असलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आखातातील विमाने आणि क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा माघारी घेऊन, ती चीनविरोधात तैनात केली जाणार असल्याचे या वर्तमानपत्राने म्हटले आहे.

क्षेपणास्त्र यंत्रणासौदी अरेबिया, जॉर्डन, कुवैत आणि इराक या चार आखाती देशांमध्ये तैनात विमाने आणि क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा इतरत्र तैनात करण्यात येतील. यामध्ये आठ पॅट्रियॉट क्षेपणास्त्रभेदी तर एका ‘टर्मिनल हाय अल्टिट्यूड एरिया डिफेन्स-थाड’ या यंत्रणेचा समावेश आहे. या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेसह तैनात केलेल्या अमेरिकी जवानांनाही माघारी बोलावले जाईल. याशिवाय या चारही देशांमध्ये तैनात लढाऊ विमानांची संख्याही कमी करण्यात येईल, अशी माहिती ‘द वॉल स्ट्रिट जर्नल’ या अमेरिकी वर्तमानपत्राने दिली. बायडेन प्रशासनातील अधिकार्‍यांच्या हवाल्याने सदर वर्तमानपत्राने हा दावा केला.

अमेरिकेचे संरक्षणमंत्री लॉईड ऑस्टिन आणि सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स व संरक्षणमंत्री मोहम्मद बिन सलमान यांच्यात या महिन्याच्या सुरुवातीला चर्चा पार पडली होती. त्यावेळी या विषयावर बोलणे झाले होते, असे या वर्तमानपत्राचे म्हणणे आहे. ही माघार मर्यादित स्वरुपाची असून गेल्या दोन वर्षांमध्ये आखाती देशांमध्ये तैनात केलेल्या यंत्रणा काढून घेत असल्याची माहिती बायडेन प्रशासनाच्या अधिकार्‍याने सदर वर्तमानपत्राला दिली.

२०१९ साली सौदी अरेबियातील दोन मोठ्या इंधन प्रकल्पांवर इराणी बनावटीच्या ड्रोन्सचे हल्ले झाले होते. यानंतर आखातातील तणाव वाढला होता तसेच सौदीतील इंधन प्रकल्पांच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आला होता. तत्कालिन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सौदीच्या इंधन प्रकल्पांच्या सुरक्षेसाठी तातडीने अतिरिक्त क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केल्या होत्या. तर गेल्या वर्षी इराणचा कमांडर कासेम सुलेमानीच्या हत्येनंतर इराकमधील अमेरिकेच्या लष्करी तळांवर ड्रोन व क्षेपणास्त्र हल्ले वाढले होते. यानंतर अमेरिकेने इराक, कुवैत येथेही क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा तैनात केल्या होत्या. याच यंत्रणा काढून घेत असल्याचे बायडेन प्रशासनाच्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.

क्षेपणास्त्र यंत्रणामात्र आखाती देशांमध्ये तैनात असलेली लढाऊ विमाने, क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा आणि हजारो जवान तसेच तैनात ठेवण्यात यातील, यात बदल होणार नसल्याचे अमेरिकी वर्तमानपत्राने म्हटले आहे. इराणबरोबरच्या अणुकरारावरील चर्चेला यश मिळाले, तर इराणपासून असलेला धोका कमी होईल व त्यानंतर आखातातील एवढ्या मोठ्या सैन्यतैनातीची आवश्यकता भासणार नाही, असे बायडेन प्रशासनाला वाटत असल्याचे या वर्तमानपत्रात म्हटले आहे.

त्याचबरोबर आखातातील ही सैन्यकपात करून चीनविरोधात याची तैनाती करणार असल्याचे बायडेन प्रशासनाच्या अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. चीनपासून वाढत असलेल्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर, ही नवी तैनाती सुरू असल्याची माहिती सदर अधिकार्‍यांनी दिली. अमेरिकी वर्तमानपत्राच्या या बातमीवर पेंटॅगॉनने प्रतिक्रिया दिलेली नाही.

पण महिन्याभरापूर्वी अमेरिकेच्या ‘सेंट्रल कमांड-सेंटकॉम’चे प्रमुख जनरल केनिथ मॅकेन्झी यांनी दिलेल्या इशार्‍याकडे बायडेन प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा दावा इतर अमेरिकी माध्यमे करीत आहेत. अफगाणिस्तानातील माघारीनंतर अमेरिकेने आखातातूनही सैन्यकपात केली किंवा माघार घेतली तर चीन आणि रशिया याचा फायदा उचलतील. चीन आखाती देशांमधील आपला प्रभाव वाढवून अमेरिकेला आव्हान देण्यासाठी वाट पाहत असल्याचे जनरल मॅकेन्झी यांनी बजावले होते.

बायडेन प्रशासन या इशार्‍याकडे दुर्लक्ष करून आखाती क्षेत्राबाबत हा महत्त्वाचा निर्णय घेत आहे. आखाती देशांमधील आपल्या क्षेपणास्त्रभेदी यंत्रणा व लढाऊ विमाने अमेरिकेने मागे घेतली, तर इराणला त्याचा फार मोठा लाभ मिळेल. किंबहुना सौदी अरेबियासारख्या देशाला धडा शिकविण्यासाठी बायडेन प्रशासन हा निर्णय घेत असल्याचे संकेत मिळत आहेत. इराणबरोबरील अमेरिकेच्या अणुकराराला कडाडून विरोध करणार्‍या इस्रायललाही याद्वारे संदेश देण्याचा बायडेन प्रशासनाचा हेतू असू शकतो.

leave a reply