सिरियातील रशियाच्या हवाई हल्ल्यात शंभर दहशतवादी ठार

रशियाने तुर्कीसंलग्न गटाला लक्ष्य केले

दमास्कस – रशियाच्या लढाऊ विमानांनी सिरियाच्या वायव्य आणि दक्षिण भागात चढविलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये किमान १०० दहशतवादी ठार झाले. यामध्ये ‘आयएस’संलग्न २० दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तुर्की संलग्न सिरियन बंडखोर तसेच ‘आयएस’ संलग्न दहशतवादी ठिकाणांना लक्ष्य केल्याचे रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे. ‘आयएस’चे दहशतवादी सिरियात पुन्हा डोके वर काढत असल्याच्या बातम्या येत असताना, रशियाची ही कारवाई महत्त्वाची ठरते.

russia syria attackसिरियामध्ये तैनात रशियाच्या लढाऊ विमानांनी रविवारी वायव्येकडील राक्का तर दक्षिणेकडील दारा या दोन प्रातांमध्ये हवाई हल्ले चढविले. यामध्ये दहशतवाद्यांचे प्रशिक्षण तळ, कमांड सेंटर, शस्त्रास्त्रांचे कोठार आणि मशिन गन्सनी सज्ज असलेली १५ वाहने लक्ष्य केल्याची माहिती रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने दिली. वायव्येकडील राक्का भागात तुर्कीसंलग्न बंडखोर संघटना ‘सिरियन नॅशनल आर्मी’ तसेच ‘हयात तहरिर अल-शाम’ या दहशतवादी संघटनांचे वर्चस्व आहे.

रशियन लढाऊ विमानांनी या दोन्ही संघटनांचा प्रभाव असलेल्या भागांवर कारवाई केल्याचे सिरियातील रशियन कमांडचे उपप्रमुख मेजर जनरल ओलाग येगोरोव्ह यांनी सांगितले. तर सिरियाच्या दक्षिणेकडील दारा भागात रशियन लढाऊ विमानांनी लेव्हंट फ्रंट आणि शाम लिजियन या आयएसशी संलग्न असलेल्या दहशतवादी संघटनेच्या ठिकाणांवर कारवाई केली. यामध्ये आयएसशी संलग्न किमान २० दहशतवाद्यांना ठार केल्याची माहिती रशियन यंत्रणांनी दिली. गेल्या आठवड्यात सिरियन लष्कराच्या वाहनावरील हल्ल्याचा सूत्रधाराचा समावेश होता.

१३ ऑक्टोबर रोजी सिरियाची राजधानी दमास्कसजवळच्या भागात सिरियन लष्कराच्या जवानांना घेऊन जाणाऱ्या लष्करी वाहनावर दहशतवाद्यांनी बॉम्बहल्ला घडविला होता. या हल्ल्यात आठ जवानांचा बळी गेला तर २७ जण जखमी झाले होते. आयएससंलग्न दहशतवादी या हल्ल्यामागे असल्याची माहिती रशियन गुप्तचर यंत्रणांनी सिरियन लष्कराला दिली होती. त्यानंतर दारामधील हल्ल्याची योजना आखण्यात आली होती.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आयएसचे दहशतवादी सिरियामध्ये छोट्यामोठ्या तीव्रतेचे हल्ले चढवत आहेत. सिरियन लष्कर तसेच नागरिकांना लक्ष्य करीत असल्याच्या बातम्या येत आहेत. युक्रेनमधील संघर्षातही सिरियातील दहशतवादी रशियाच्या विरोधात उतरल्याचे दावे करण्यात आले होते. अशा परिस्थितीत, रशियाने सिरियातील आयएस व संलग्न दहशतवादी संघटनांना लक्ष्य करून आपल्या विरोधातील कारवायांच्या परिणामांची स्पष्टपणे जाणीव करून दिल्याचे दिसत आहे.

leave a reply