चीनपासून बेटांच्या सुरक्षेसाठी जपान कामिकाझे ड्रोन्स तैनात करणार

जपानच्या वर्तमानपत्राचा दावा

टोकिओ – ईस्ट चायना सीच्या क्षेत्रातील आपल्या बेटांवर शत्रूदेशाच्या लष्कराने हल्ला चढविलाच तर या बेटांच्या सुरक्षेसाठी कामिकाझे अर्थात आत्मघाती ड्रोन्स तैनात करण्याची तयारी जपानने केली आहे. अशा ड्रोन्सच्या खरेदीसाठी जपानच्या संरक्षणखर्चात विशेष तरतूद करण्यात आली आहे. २०२५ सालापर्यंत जपानच्या दूरअंतरावरील बेटांवर या ड्रोन्सची तैनाती पूर्ण होईल, असा दावा जपानच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने केला.

japan kamikaze dronesसाधारण दीड महिन्यापूर्वी जपानच्या सरकारने ३७.६ अब्ज डॉलर्स इतका आत्तापर्यंतचा सर्वात मोठा संरक्षणखर्च जाहीर केला होता. चीन आणि उत्तर कोरियापासून जपानच्या सुरक्षेला, विशेषत: सेंकाकू व जवळपासच्या बेटांना वाढत असलेला धोका अधोरेखित करून या संरक्षणखर्चाची घोषणा करण्यात आली होती. चीन सारखा ईस्ट चायना सी क्षेत्रातील यथास्थिती बदलण्याच्या धमक्या देत आहेत, याची आठवण जपानच्या सरकारने करुन दिली होती. तर या संरक्षणखर्चात कामिकाझे ड्रोन्सच्या खरेदीसाठी तरतूद असल्याच्या बातम्या जपानच्या वर्तमानपत्राने सूत्रांच्या हवाल्याने प्रसिद्ध केल्या होत्या.

जपानने याबाबत तपशील देण्याचे टाळले होते. पण रविवारी जपानच्या आघाडीच्या वर्तमानपत्राने सरकारी अधिकाऱ्यांचा हवाला देऊन याबाबत नवी माहिती प्रसिद्ध केली. जपान लवकरच अमेरिका आणि इतर देशांकडून कामिकाझे ड्रोन्सची खरेदी करणार आहे. हे ड्रोन्स नान्सी बेटसमुह व इतर दूर अंतरावरील बेटांवर करण्यात येणार आहे. या तैनातीनंतर जपान देशांतर्गत कामिकाझे ड्रोन्सच्या निर्मितीसाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती सदर वर्तमानपत्राने दिली. चीनने आधीच कामिकाझे ड्रोन्सची चाचणी घेऊन त्यांना कारवाईसाठी तैनात केले आहेत, याकडे जपानी वर्तमानपत्राने लक्ष वेधले.

गेल्या सहा महिन्यांपासून पेटलेल्या रशियाबरोबरच्या युद्धात युक्रेन देखील कामिकाझे ड्रोन्सचा वापर करीत आहे. यामध्ये अमेरिकेने पुरविलेल्या ‘स्विचब्लेड’ आणि ‘फिनिक्स घोस्ट’ या आत्मघाती ड्रोन्सचा समावेश असल्याचा दावा केला जातो. तर रशियाने देखील युक्रेनची राजधानी किव्हवरील हल्ल्यांसाठी कामिकाझे ड्रोन्सचा वापर केल्याच्या बातम्या येत आहेत.

दरम्यान, चीनचा धोका अधोरेखित करून तैवानने दोन वर्षांपूर्वीच कामिकाझे ड्रोन्सचे मोठे पथक तैनात करणार असल्याची घोषणा केली होती. तैवानप्रमाणे जपान देखील चीनविरोधात अशाच कामिकाझे ड्रोन्सचा वापर करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

leave a reply