महाराष्ट्रात चोवीस तासात कोरोनाचे १०५ बळी

मुंबई, (वृत्तसंस्था) – बुधवारी महाराष्ट्रात कोरोनाच्या साथीने १०५ जणांचा बळी घेतला. चार दिवसात राज्यात ३२० जण दगावले आहेत. यामुळे राज्यात या साथीने दगावलेल्यांची संख्या १९०० वर पोहोचली आहे. राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येबरॊबर वाढत असलेले मृत्यू चिंतेचा विषय ठरत आहेत. राज्यात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५७ हजारांजवळ पोहोचली आहे.

देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या एक लाख ५५ हजारांपर्यंत पोहोचली आहे. मंगळवारपासून बुधवार सकाळपर्यंत देशात १५७ जण दगावले आणि ६,३८७ रुग्ण आढळले.  गेल्या सहा दिवसांपासून देशात दररोज सहा हजाराहून अधिक रुग्णांची भर पडत आहे. यामध्ये सर्वात जास्त रुग्ण महाराष्ट्रात आढळून येत आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून राज्यात दरदिवशी दोन हजारहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत असून आता कोरोनाने होणारे मृत्यूही वाढले आहेत. 

बुधवारी राज्यात १०५ जण दगावले, त्याआधी मंगळवारी ९७ जण दगावले होते. दरदिवशी कोरोनाने होणारे मृत्यू आता ९० आणि १०० च्या घरात पोहोचले आहेत. ही प्रशासनसमोरील चिंता वाढविणारी बाब ठरते. चोवीस तासात मुंबईत ३२ जण दगावले आहेत. ठाण्यात १६, जळगावमध्ये १०, पुण्यात ९ आणि  नवी मुंबईत ७ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. 

राज्यात बुधवारी २,१९० रुग्ण सापडले. यामुळे राज्यतील एकूण रुग्ण संख्या ५६,९४८ वर पोहोचली आहे. मुंबईतच १,०४४  नव्या रुग्णांची नोंद झालेली आहे. दरम्यान राज्यात ५ लाख ८२ हजार जण क्वारंटाईन आहेत, अशी माहितीही राज्य सरकारच्या वतीने देण्यात आली. 

leave a reply