देशातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या १२ लाखांवर – महाराष्ट्रात चोवीस तासात १०५७६ नवे रुग्ण आढळले

नवी दिल्ली – देशातील कोरोनाच्या साथीच्या रुग्णांची संख्या १२ लाखांच्या पुढे गेली आहे. तसेच या साथीच्या बळींची संख्या ३० हजारांजवळ पोहोचली आहे. गेल्या सहा दिवसातच देशात सुमारे सव्वा दोन लाख रुग्णांची नोंद झाली आहे. तर जुलै महिन्यातच आतापर्यंत सुमारे सहा लाख रुग्णांची नोंद झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, कर्नाटक या राज्यांमध्ये नवे रुग्ण सापडण्याचे उच्चांक नोंदविले जात असून गेल्या तीन दिवसांपासून या चार राज्यातच २० हजारांहून अधिक रुग्ण नोंदविले जात आहेत.

रुग्णांची संख्या

मंगळवारी देशात ३७ हजार ७२४ नवे रुग्ण आढळले होते. यामुळे देशातील या साथीच्या रुग्णांची संख्या ११ लाख ९३ हजारांवर पोहोचली होती. बुधवारी रात्रीपर्यंत देशभरात सुमारे ४० हजार नवे रुग्ण आढळल्याचे राज्यांकडून जाहीर माहितीवरून स्पष्ट झाले. महाराष्ट्रातच एका दिवसात २८० जण दगावले आणि १०५७६ आढळले. यामुळे राज्यातील या साथीने दगावलेल्यांची संख्या १२,५५६ वर पोहोचली असून एकूण रुग्णांची संख्या ३ लाख ३७ हजारांवर गेली आहे. बुधवारी मुंबईत ५८ जण दगावले.

बुधवारी तामिळनाडूमध्ये ७२ जण दगावले, तसेच चेन्नईतील आतापर्यंत नोंद न झालेल्या कोरोनाच्या ४४४ बळींची माहितीही या राज्याने जाहीर केली. यामुळे या तामिळनाडूमधील या साथीच्या एकूण बळींची संख्या ३ हजार १४४ वर पोहोचली आहे. याशिवाय तामिळनाडूत चोवीस तासात ५,९४९ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे तामिळनाडूतील एकूण रुग्णांची संख्या १ लाख ८६ हजारांवर पोहोचली आहे.

आंध्र प्रदेशात चोवीस तासात तब्बल ६५ जणांचा या साथीने बळी गेला, तसेच ६ हजार ४५ नव्या रुग्णांची नोंद झाली. सर्वात जास्त रुग्ण विशाखापट्टणममध्ये आढळले आहेत. या आठवड्यात आंध्र प्रदेशात या साथीच्या रुग्ण संख्येत मोठी उसळी दिसून आली आहे. महाराष्ट्रानंतर एका दिवसात ६ हजाराहून अधिक रुग्णांची नोंद झालेले आंध्र प्रदेश दुसरे राज्य आहे. यामुळे या राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ६५ हजारांवर गेली आहे.

कर्नाटकात चोवीस तासात ५५ जणांचा कोरोनाने बळी गेला आणि ४ हजार ७६४ नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तामिळनाडू आणि कर्नाटक या चार राज्यातच बुधवारी कोरोनाच्या ९६१ बळींची नोंद झाली आहे. तसेच २७ हजार ३०० हून अधिक नवे रुग्ण आढळले आहेत.

leave a reply