इराण रशियाशी २० वर्षांसाठी सहकार्य करार करणार

मॉस्को – इराण आणि रशियातील सहकार्य फार जूने असून यापुढेही हे सहकार्य असेच सुरू राहील. किमान २० वर्षांसाठी उभय देशांमध्ये सहकार्य करार केला जाईल, अशी घोषणा इराणचे परराष्‍ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी केली. याआधीच इराण आणि चीनमधील ४०० अब्ज डॉलर्सच्या सहकार्यावर अमेरिका आणि मित्रदेशांकडून टीका होत आहे. चीननंतर रशियाशी प्रदिर्घ सहकार्य प्रस्थापित करुन इराण स्वत:चे लष्करी सामर्थ्य वाढविण्याच्या प्रयत्‍नात असल्याचा दावा केला जातो.

सहकार्य करार

रशियाबरोबरच्या सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी इराणचे परराष्‍ट्रमंत्री जावेद झरीफ रशियात दाखल झाले आहेत. गेल्या महिन्याभरात इराणच्या परराष्‍ट्रमंत्र्यांचा हा दुसरा रशिया दौरा ठरतो. आपल्या या दौर्‍याबाबत इराणी वृत्तवाहिनीशी बोलताना रशियाबरोबर २० वर्षांचा सहकार्य करार आपल्या अजेंडावर असल्याचे परराष्‍ट्रमंत्री झरीफ यांनी सांगितले. इराण-रशियामधील हे प्रदिर्घ सहकार्य सामरिकदृष्ट्या महत्त्वाचे असेल, अशी माहिती झरीफ यांनी दिली. यावेळी इराणचे परराष्‍ट्रमंत्री रशियाचे परराष्‍ट्रमंत्री सर्जेई लाव्हरोव्ह यांची भेट घेणार आहेत.

याआधी २००१ साली इराण आणि रशियामध्ये २० वर्षांचा सहकार्य करार झाला होता. हा वीस वर्षांचा करार पुढच्या वर्षी संपुष्टात येत आहे. त्यापार्श्वभूमीवर इराणचे परराष्‍ट्रमंत्री रशियात दाखल झाले आहेत. या सहकार्य करारांतर्गत रशियाने इराणला संरक्षण साहित्यांची विक्री केली होती. यामध्ये एस-४०० या हवाई संरक्षण यंत्रणेचाही समावेश होता. अमेरिका आणि मित्रदेशांनी सदर सहकार्यावर टीका करुन इराणची शस्त्रसज्जता आखातात शस्त्रस्पर्धा भडकवेल, असा आरोप पाश्चिमात्य देशांनी केला होता. आताही इराण अमेरिकेच्या निर्बंधांना बगल देण्यासाठी रशियाबरोबरच्या या सहकार्याच्या आडून शस्रसज्जतेसाठी प्रयत्‍न करीत असल्याचा दावा केला जातो.

leave a reply