सिरियातील शरणार्थी शिबिरातून ‘आयएस’च्या १२५ दहशतवाद्यांना अटक

- सिरियन कुर्द संघटनेची कारवाई

बैरूत – ‘आयएस’च्या नरसंहारामुळे विस्थापित झालेल्या सिरियन जनतेसाठी उभारलेल्या शरणार्थी शिबिरातच दहशतवाद्यांनी घुसखोरी केल्याचे उघड झाले आहे. सिरियातील कुर्दांच्या लष्करी संघटनेने केलेल्या कारवाईत ‘अल-होल’ शिबिरातून आयएसच्या १२५ दहशतवाद्यांना ताब्यात घेतले आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सदर शरणार्थी शिबिरात झालेल्या ४० हून अधिक निर्घृण हत्याकांडामागे ‘आयएस’चे दहशतवादी होते, असा आरोप कुर्द संघटनेने केला आहे.

अमेरिकेचे समर्थन असलेल्या ‘सिरियन डेमोक्रॅटिक फोर्सेस’ने (एसडीएफ) काही दिवसांपूर्वी सिरियाच्या ईशान्येकडील ‘अल-होल’ शिबिरावर कारवाई केली. सिरियन कुर्दांनी या कारवाईचे नेतृत्व केले होते. यामध्ये आयएसच्या स्लिपर सेलच्या १२५ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली. यामध्ये २० कमांडर्सचा सहभाग होता. वर्ष सुरू झाल्यापासून गेल्या तीन महिन्यांमध्ये अल-होल शिबिरात किमान ४७ जणांची निर्घृण हत्या करण्यात आली असून यामध्ये सदर कमांडर्सचा सहभाग होता, अशी माहिती कुर्द संघटनेचा प्रवक्ता अली अल-हसन याने दिली.

या दहशतवाद्यांनी शरणार्थी म्हणून या शिबिरात आश्रय घेतला होता. अल-होल शिबिरात ६२ हजाराहून अधिक शरणार्थी आहेत. शिबिरातील क्षमतेच्या तुलनेत येथील शरणार्थींची संख्या खूपच अधिक असल्याचा दावा केला जातो. त्यामुळे या शरणार्थींच्या आड आयएसचे दहशतवादी शिबिरात दडून बसल्याचा आरोप हसन याने केला. शिबिरात राहून संघटना मजबूत करण्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता. या कारवाईत दहशतवाद्यांकडून इलेक्ट्रॉनिक सर्किटद्वारे तयार केलेली स्फोटके व काही शस्त्रास्त्रे सापडल्याची माहिती ‘एसडीएफ’ने दिली.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार संघटनेच्या सहाय्याने कुर्दांनी सिरियामध्ये उभारलेल्या दोन शरणार्थी शिबिरांपैकी अल-होल हे सर्वात मोठे शिबिर मानले जाते. या शिबिरात विस्थापिताबरोबर आयएस दहशतवाद्यांच्या कुटुंबियांनाही आश्रय देण्यात आला आहे. या शिबिरातील काही भागावर आयएस दहशतवाद्यांच्या पत्नींचे अर्थात ‘किलर ब्राईड’चे नियंत्रण असल्याच्या व त्यांनी हत्याकांड घडविल्याच्या तक्रारीही याआधी उघड झाल्या होत्या.

पण गेल्या काही महिन्यांपासून अल-होल शिबिरातील आयएस तसेच कट्टरपंथियांचा प्रभाव वाढत चालल्याचा दावा केला जातो. ‘एसडीएफ’च्या कारवाईतून हे उघड झाले आहे. पण अजूनही अल-होलमध्ये आयएसचे दहशतवादी, समर्थक आणि स्लिपर सेल असण्याची भीती एसडीएफ व्यक्त करीत आहे.

leave a reply