लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेची 12वी फेरी सुरू होणार

नवी दिल्ली – लडाखच्या एलएसीवर भारत व चीनमध्ये निर्माण झालेला तणाव कमी करण्यासाठी चर्चेची 12 वी फेरी लवकरच सुरू होईल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी ही माहिती दिली. ही चर्चा 26 जुलै रोजी व्हावी, अशी मागणी चीनने केली होती. पण हा कारगिल विजयदिन असून या दिवशी ही चर्चा होऊ शकत नाही, असे सांगून भारताने या मागणीला नकार दिला. त्याऐवजी चीनने दुसरी तारीख निवडावी, असे भारताने सुचविले आहे. दरम्यान, चर्चेच्या या फेरीआधी चीनच्या सरकारी मुखपत्राने गलवानच्या संघर्षात आपले चार नाही तर पाच जवान ठार झाल्याची माहिती दिली.

Advertisement

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेची 12वी फेरी सुरू होणारलडाखच्या एलएसीवरील तणाव कमी झाला असला तरी अजूनही भारताने केलेल्या मागणीनुसार चीनने गोग्रा, डेप्सांग आणि हॉटस्प्रिंग या भागातून आपले जवान मागे घेतलेले नाही. या माघारीखेरीज एलएसीवरील तणाव कमी होणार नाही, याची जाणीव भारत चीनला सातत्याने करून देत आहे. भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर व चीनचे परराष्ट्रमंत्री वँग ई यांच्या 14 जुलै रोजी दुशांबे येथे झालेल्या चर्चेतही चीनला याची पुन्हा एकदा जाणीव करून देण्यात आली. एलएसीवर एकतर्फी कारवाई भारत कधीही खपवून घेणार नाही, असे परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी बजावले होते. तर भारत आणि चीन एकमेकांचे वैरी नाहीत, भागीदार आहेत, असे सांगून चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांनी सीमावादाची तीव्रता कमी करण्याचा प्रयत्न केला होता.

लडाखच्या एलएसीवरील तणाव कमी करण्यासाठी भारत व चीनमध्ये चर्चेची 12वी फेरी सुरू होणारत्या पार्श्‍वभूमीवर, दोन्ही देशांमध्ये लडाखच्या एलएसीवरचा तणाव कमी करण्यासाठी चर्चेची 12 वी फेरी पार पडेल. आधी झालेल्या चर्चेच्या 11 फेर्‍यांमध्ये लडाखच्या एलएसीवरील सैन्य मागे घेण्याचे निश्‍चित झाले होते. चीनने आपले जवान इथून मागेही घेतले होते. पण गोग्रा, डेप्सांग आणि हॉटस्प्रिंग मध्ये अजूनही चिनी जवान तैनात आहेत. याद्वारे चीन सदर भागावरचा आपला अधिकार प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पण ते खपवून घेतले जाणार नाही, असे भारताने स्पष्ट केले होते. भारतीय लष्कर लडाखच्या एलएसीजवळील चीनच्या हालचालींवर करडी नजर रोखून आहेत. त्यामुळे भारतावर पुन्हा एकदा दडपण वाढविण्याचे चीनचे प्रयत्न अपयशी ठरले आहेत.

अशा परिस्थितीत होत असलेल्या या चर्चेतून फारसे काही निष्पन्न होण्याची शक्यता नाही. लडाखच्या एलएसीवरचा तणाव इतक्यात निवळणार नाही, असे लष्करी अधिकारी स्पष्टपणे सांगत आहेत. दोन्ही देशांमधील चर्चेची ही 12 फेरी सुरू होण्याच्या आधी चीनचे सरकारी मुखपत्र ग्लोबल टाईम्सने गेल्या वर्षी झालेल्या गलवानच्या संघर्षात चीनचे पाच जवान ठार झाल्याचे म्हटले आहे. फेब्रुवारी महिन्यात चीनने या संघर्षात आपले केवळ चार जवान ठार झाल्याची माहिती दिली होती. पण प्रत्यक्षात भारताहून अधिक संख्येने चिनी जवानांचा या संघर्षात बळी गेल्याचे स्पष्ट झाले होेते. मात्र आपली प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी चीन ही बाब मान्य करायला तयार नव्हता. पण आता चीनला ही बाब मान्य करावी लागत असल्याचे दिसते. गलवानच्या संघर्षाबाबत अधिक माहिती मिळवू पाहणार्‍या ब्लॉगरवर चीनच्या यंत्रणांनी प्रवासबंदी टाकल्याची बातमी नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

leave a reply