गडचिरोलीतील चकमकीत १३ माओवादी ठार

मुंबई – महाराष्ट्राच्या गडचिरोली जिल्ह्यातील इटापल्लीमधील जंगलात ‘सी-६०’ कमांडो पथकाच्या जवानांनी १३ माओवाद्यांना ठार केले. यामध्ये माओवाद्यांच्या उत्तर गडचिरोली विभागाच्या प्रमुख सदस्याचाही समावेश आहे. चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणावर शस्त्रे व स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.

माओवादी ठार२०१८ साली गडचिरोलीच्या बारीया-कसनासूरमध्ये जवानांनी ४१ माओवादी चकमकीत ठार केले होते. त्यानंतर गडचिरोलीतील माओवाद्यांच्या विरोधातील मोहिमेला मिळालेले हे दुसरे मोठे यश ठरते, असे गडचिरोलीचे अतिरिक्त पोलीस अधिक्षक मनिष कलवानी यांनी म्हटले आहे.

गडचिरोलीत सध्या तेंदूपत्ताचा हंगाम असून या काळात माओवादी येथील तेंदूपत्ता व्यापार्‍यांकडून खंडणी वसूल करतात. या वसुलीसाठी काही माओवादी इटापल्लीमधील पायडी-कोटामी या जंगलांमध्ये येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर माओवाद्यांविरोधात कारवाईसाठी विकसित करण्यात आलेल्या ‘सी-६०’ कमांडो पथकाच्या चार तुकड्या मोहीमेसाठी रवाना झाल्या.

माओवाद्यांना पकडण्यासाठी जवानांनी सापळा लावला. जंगलात एका ठिकाणी माओवादी जमू लागले. इथे जवानांना पाहताच माओवाद्यांनी गोळीबार सुरू केला. त्यानंतर मोठी चकमक उडाली. दोन्ही बाजूने सुमारे सुमारे दीड तास गोळीबार सुरू होता. जवानांना या भागात १३ माओवाद्यांचे मृतदेह मिळाले असून यामध्ये सात महिला माओवाद्यांचा समावेश आहे. माओवाद्यांकडून एके-४७ रायफल, एसएलआर रायफल, ३०३ रायफल, १२ बोअर रायफलसह आयईडीही जप्त करण्यात आले.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडला लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सीमेत माओवाद्यांच्या हालचाली वाढल्या होत्या. दीड महिन्यांपूर्वी छत्तीसगडमध्ये माओवाद्यांनी सीआरपीएफ आणि छत्तीसगड पोलिसांच्या गस्तीपथकावर केलेल्या हल्ल्यात २२ जवान शहीद झाले होते. यानंतर माओवाद्यांविरोधात छत्तीसगडमध्ये मोठी मोहीम हाती घेण्यात आली. त्यामुळे काही माओवादी महाराष्ट्र सीमेत दाखल झाले आहेत. याशिवाय माओवाद्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग पसरल्याचे वृत्त आहे.

कोरोनाचा संसर्ग झालेल्या माओवाद्यांनी शरण यावे, त्यानंतर त्यांच्यावर उपचार केले जातील, असे आवाहन छत्तीसगडसह आंध्र प्रदेश व तेलंगणा सरकारने केले होते. त्याला प्रतिसाद देऊन कोरोनाचा संसर्ग झालेले काही माओवादी शरण आले आहेत.

leave a reply