‘डीआरडीओ’कडून अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित

नवी दिल्ली – कोरोनापासून बचावासाठी लस उपलब्ध झाली आहे. तरीही या विषाणूविरोधात संशोधक आणि वैज्ञानिकांचे प्रयत्न मात्र थांबलेले नाहीत. ‘भारतीय संरक्षण संशोधन व विकास संस्थे’ने (डीआरडीओ) आता अँटीबॉडी डिटेक्शन किट विकसित केले आहे. या किटला ‘डीपकोव्हॅन’ असे नाव देण्यात आले असून याद्वारे शरीरात अँटिबॉडीची चाचणी करता येईल. डीआरडीओने ‘डीपकोव्हॅन’ वेन्गार्ड डायग्नोसिस या कंपनीच्या सहकार्याने तयार केले असून हे पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञान आहे.

अँटीबॉडी डिटेक्शन किट‘डीपकोव्हॅन’ कीटच्या माध्यमातून एखाद्यांच्या शरीरात अँटिबॉडी तयार झाली आहे, का हे कळू शकते. अँटिबॉडीची निर्मिती शरीरातील रोगप्रतिकार प्रणालीद्वारे केली जाते. एखाद्याला विषाणूची लागण होते, त्यावेळी शरीरात अशा अँटीबॉडीज् तयार होऊन त्या विषाणूशी लढू लागतात. ‘डीपकोव्हॅन’ किटद्वारे करण्यात येणार्‍या चाचणीत विषाणूच्या स्पाईक आणि न्यूक्लिओकॅप्सिड (एस ऍण्ड एम) प्रोटीनचा शोध लावता येतो.

या किटद्वारे अवघ्या ७५ मिनिटात शरीरातील अँटीबॉडीबद्दल कळू शकते. बर्‍याचदा कोरोनाची लागण होऊनही लक्षणे आढळत नाहीत. त्यामुळे अशा व्यक्ती चाचणी करायला जात नाहीत. अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांची अँटीबॉडी चाचणी केल्यास त्यांना कोरोना संक्रमण झाले आहे का याचे निदान होऊ शकेल. तसेच याआधी त्यांना कोरोनाला लागण होऊन गेली आहे का? याचीही माहिती या चाचणीमुळे मिळू शकते.

‘डीपकोव्हॅन’च्या एका किटपासून १०० चाचण्या करता येऊ शकतात. गेल्याच महिन्यात या अँटीबॉडी डिटेक्शन किटला ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने (आयसीएमआर) मान्यता दिली होती. तर काही दिवसांपूर्वीच ‘द ड्रग्ज् कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया’ने (डीसीजीआय) आणि ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने ‘डीपकोव्हॅन’चे उत्पादन व विक्रीस मान्यता दिली. मात्र त्याची अधिकृत पातळीवरील घोषणा शुक्रवारी करण्यात आली. जूनच्या पहिल्या आठवड्यांपासून याचे उत्पादन सुरू होणार असून विविध रुग्णालयांना हे किट उपलब्ध करून दिले जाईल.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी ‘डीआरडीओ’ने तयार केलेल्या किटचे, तसेच कोरोनाविरोधातील लढाईत ‘डीआरडीओ’च्या सहभागाचे कौतूक केले आहे. ‘डीआरडीओ’चे अध्यक्ष डॉ. जी. सतीश रेड्डी यांनीही हे किट तयार करणार्‍या संशोधकांची प्रशंसा केली आहे.

नुकतेच ‘डीआरडीओ’ने ‘२-डिऑक्सी-डी-ग्लूकोज’ (२-डीजी) हे कोरोनावर उपचार करणारे प्रभावी औषध तयार केले होते. चार दिवसांपूर्वी हे औषध बाजारात आले आहे. तसेच डीआरडीओने कोरोनाची साथ आलेली असताना, स्वदेशी व्हेंटिलेटर तंत्रज्ञान, ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तयार केले आहेत. तसेच डीआरडीओने कित्येक ठिकाणी तात्पुरत्या स्वरुपाची रुग्णालयेही उभारून दिली आहेत.

leave a reply