पुणे आणि मध्य प्रदेशातून १३७ किलो अमली पदार्थ जप्त

भोपाळ/पुणे – पुणे शहरासह मध्य प्रदेशच्या नरसिंगपूरमध्ये १३७ किलोहून अधिक अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये मेफेड्रोन, हशीश या अमली पदार्थांचा समावेश आहे आंतरराष्ट्रीय बाजारात या अमली पदार्थांची किंमत २६ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणी बारा जणांना अटक करण्यात आली आहे.

पुण्याच्या चाकणजवळील शेल पिंपळगावमध्ये पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने २० किलो मेफेड्रोनचा साठा जप्त केला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या मेफेड्रोनची किंमत २० कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. शेल पिंपळगाव इथे अमली पदार्थांची विक्री करण्यासाठी काही जण येणार असल्याची खबर पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार बुधवारी दुपारी सापळा लावून पोलिसांनी ५ जणांना अटक केली.

दुसरीकडे मध्य प्रदेशातील महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) भोपाळ युनिटने नेपाळहून आणलेले ११७ किलो चरस जप्त केले. डीआरआयने याप्रकरणी मध्य प्रदेशातील नरसिंगपूर जिल्ह्यातून सात जणांना ताब्यात घेतले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त केलेल्या अमली पदार्थाची किंमत सहा कोटी रुपये इतकी आहे.

त्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. तस्करांनी हशीश लपविण्यासाठी पकडण्यात आलेल्या दोन्ही वाहनात एक विशेष जागा बनवली होती. पोलिसांनी ११७ किलो हशीशसह या दोन्ही मोटारी जप्त केल्या आहेत. या गाड्यांची नोंद उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूमधील आहे. तस्करी प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली असून त्याच्याविरोधात एनडीपीएस कायद्यांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आला आहे.

leave a reply