‘किसान रेल्वे’ला जोरदार प्रतिसाद

- रेल्वे मंत्रालय

नवी दिल्ली – भारतीय रेल्वेतर्फे ऑगस्टपासून सुरु करण्यात आलेल्या किसान रेल्वेला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. मध्य रेल्वे झोनच्या सांगोला येथून नुकत्याच एका किसान रेल्वेमध्ये १८७.४१ टन माल वाहून नेण्यात आला, अशी माहिती रेल्वे मंत्रालयातर्फ़े देण्यात आली. किसान रेल्वेला मिळणार प्रतिसाद पाहता आंबा, केळी, चिकू, कांदा यांच्या वाहतुकीसाठी विशेष रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. तसेच लवकरच भाज्या आणि फळांव्यतिरिक्त मास आणि मासळीचीही वाहतूक सुरु करण्याचा विचार असल्याचेही रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट सरकारने ठेवले आहे. यादृष्टीने सुरु करण्यात येत असलेल्या किसान रेल्वे महत्वाच्या ठरणार आहेत. याआधी महाराष्ट्रातील देवळाली आणि बिहारमधील दानापूर दरम्यान किसान रेल्वेची साप्ताहिक सेवा सुरु करण्यात आली होती. या रेल्वेला मिळणार प्रतिसाद पाहता ही सेवा आठवड्यातून दोन वेळा सुरु करण्यात आली. त्यानंतर अनंतपूर आणि दिल्लीमधील आदर्श नगर ही देशातील दुसरी किसान रेल्वे सुरु झाली आहे. दक्षिण भारतातून धावणारी ही पहिली किसान रेल्वे आहे.

किसान रेल्वेला मिळणार प्रतिसाद पाहता देवळाली-मुझफ्फरपूर दरम्यान किसान रेल्वे आठवड्यांतून तीन वेळा सुरु करण्यात आली आहे. या मार्गावर २ ऑक्टोबरपर्यंत या रेल्वेने १९ फेऱ्या मारल्या असून ५२२३ टन मालाची वाहतूक केली. प्रत्येक मोसमात मिळणारी फळे आणि भाज्यांचा विचार करून विशेष रेल्वे चालवल्या जाणार आहेत. ही सेवा देण्याच्या योजनेवर रेल्वे आणि कृषी मंत्रालय काम करत असून तूर्तास काही मार्ग निश्चित करण्यात आले आहेत.

नाशिक व जळगाव ते दिल्ली दरम्यान मार्च ते डिसेंबर या काळात कांदा स्पेशल आणि केळी स्पेशल किसान रेल्वे सुरु करण्यात येईल. यासह आंध्रप्रदेश ते दिल्ली दरम्यान एप्रिल ते जून या काळात आंबा स्पेशल रेल्वे, तसेच गुजरातमधील सुरत, वलसाड आणि नवसारी ते दिल्लीपर्यंत एप्रिल ते नोव्हेंबर या काळात चिकू स्पेशल ट्रेन सुरु करण्यात येईल.

राज्यातील उत्पादनांसाठी नवे मार्ग सुचवण्याचे आवाहन कृषी, पशुपालन आणि मत्स्य व्यवसाय विभागांच्या अधिकाऱ्यांना करण्यात आले आहे. लवकरच याबाबत निर्णय घेऊन किसान रेल्वेच्या मार्गात वाढ करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

leave a reply