पाकिस्तानी लष्कराच्या अफगाणिस्तानातील हल्ल्यात १५ जणांचा बळी

काबुल – पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतात चढविलेल्या रॉकेट्‍स आणि तोफगोळ्यांच्या हल्ल्यात १५ अफगाणींचा बळी गेला. पाकिस्तानी लष्कराच्या या हल्ल्यानंतर संतापलेल्या अफगाणिस्तानने आपल्या लष्कर तसेच हवाईदलाला प्रत्युत्तरासाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या काही दिवसांमध्ये पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानात चढविलेला हा दुसरा मोठा हल्ला ठरतो. पाकिस्तानी लष्कर आपल्या सीमाभागातील नागरी वस्त्यांवर हल्ले चढवित असल्याची तक्रार अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत केली होती. दरम्यान, अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतात दहशतवाद्यांनी घडविलेल्या स्फोटात १७ जणांचा बळी गेला आहे.

Pakistan-Armyगेल्या काही दिवसांपासून अफगाणिस्तान आणि पाकिस्तानने धार्मिक सणाच्या निमित्ताने दोन्हीकडच्या जनतेच्या सोयीसाठी आपल्या सीमारेषा खुल्या करण्याचे जाहीर केले होते. पण दिलेल्या आश्वासनातून माघार घेण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानने अफगाणी जनतेला प्रवेश देण्याचे नाकारून सीमारेषा बंद ठेवली होती. यामुळे संतापलेल्या अफगाणी जनतेने ’चमन-स्पिन बोल्दाक’ सीमेसमोरच निदर्शने सुरू केली. यावेळी पाकिस्तानी जवानांनी अफगाणी निदर्शकांवर कारवाई केल्यानंतर सदर सीमेवर अफगाणी आणि पाकिस्तानी लष्करात संघर्ष भडकला. यानंतर पुढच्या काही तासात पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या कंदाहार प्रांतात रॉकेट्‍स आणि तोफगोळ्यांचे हल्ले चढविले.

पाकिस्तानी लष्कराने स्पिन बोल्दाकच्या रहिवाशी भागात चढविलेल्या या हल्ल्यांमध्ये १५ जणांचा बळी गेला असून यामध्ये महिला आणि मुलांचा समावेश असल्याची माहिती कंदाहार प्रांताचे गव्हर्नर हयातुल्लाह हयात यांनी दिली. पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये ८० अफगाणी देखील जखमी झाले आहेत. यानंतर अफगाण सरकारने आपल्या सुरक्षा यंत्रणांना पुढील कारवाईसाठी तयार राहण्याचे आदेश दिले आहेत. अफगाणी लष्कराच्या स्पेशल फोर्सेसच्या ‘अटल २०५’, ‘सेलाब २०१’ आणि ‘थंडर २०३’च्या पथकांना सतर्क केले असून वायुसेनेलाही सावध राहण्याची सूचना केल्याची माहिती टोलो न्यूज या अफगाणी वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केली. सध्या अफगाण-पाकिस्तान सीमेवर तणाव निर्माण झाल्याचे या वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

Pakistan-Armyया आठवड्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानी लष्कराने अफगाणिस्तानच्या सीमाभागात हल्ले चढविले होते. पाकिस्तानच्या या हल्ल्यांमध्ये १० जणांचा बळी गेल्यानंतर अफगाणिस्तानने संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत पाकिस्तानविरोधात तक्रार केली होती. तर जैश-ए-मोहम्मद, लश्कर-ए-तोयबा या पाकिस्तानी दहशतवादी संघटना अफगाणिस्तानात सक्रीय असल्याची माहिती यादरम्यान समोर आली होती. अफगाणी लष्कराच्या कारवाईत ठार झालेले किंवा अटक झालेल्या दहशतवाद्यांमध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांचा समावेश असल्याचा आरोप यावेळी अफगाण सरकारने केला होता. त्यानंतर पाकिस्तानकडून अफगाणी सीमाभागातील हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. याआधीही ड्युरंड लाईनच्या वादावरुन अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये वाद पेटला आहे.

दरम्यान, अफगाणिस्तानच्या लोगार प्रांतात गुरुवारी झालेल्या कार बॉम्बस्फोटात किमान १७ जणांचा बळी गेला आहे. या हल्ल्याशी आपल्या संघटनेचा काही संबंध नसल्याचे तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे. तालिबानने अफगाण सरकारशी तीन दिवसांची संघर्षबंदी केल्याची आठवण मुजाहिद करुन देत आहे. पण तालिबानमधील सगळेच गट अफगाण सरकारबरोबरच्या संघर्षबंदीशी सहमत नसल्याचे याआधी उघड झाले होते.

leave a reply