अमेरिकेत चोवीस तासात कोरोनाचे १८८३ बळी

- रशियात दिवसभरात नऊ हजाराहून अधिक नवे रुग्ण

वॉशिंग्टन/मॉस्को – कोरोनाव्हायरसमुळे जगभरात दगावलेल्यांची संख्या २,४०,६३१ वर पोहोचली आहे. अमेरिकेत गेल्या चोवीस तासात १८८३ जणांचा बळी गेला असून सलग तीन दिवसानंतर अमेरिकेतील एका दिवसातील बळींची संख्या कमी झाल्याचे बोलले जाते. दरम्यान, पंतप्रधान मिखाईल मिशुस्तीन यांच्यानंतर रशियन सरकारमधील आणखी दोन नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे.

जगभरात कोरोनाव्हायरसमुळे दगावलेल्यांपैकी एकट्या अमेरिकेतील बळींची संख्या ६५,८८८ वर पोहोचली आहे. अमेरिकेत या साथीचे ११,३४,०८४ रुग्ण असून गेल्या चोवीस तासात तीस हजाराहून अधिक नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या साथीवर लस शोधण्यासाठी अमेरिकी संशोधकांनी जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘रेम्डेसीवीर’ या औषधनिर्मिती कंपनीच्या वरिष्ठांची भेट घेतल्याची बातमी समोर येत आहे.

युरोपात या साथीने १,३९,१४२ जणांचा बळी घेतला आहे. इटलीमध्ये या साथीचे २८,७१० बळी गेले असून गेल्या चोवीस तासात या देशात कोरोनाचे चारशेहून अधिक जण दगावले आहेत. तर गेल्या चोवीस तासात ब्रिटनमध्ये ६२१ जणांचा बळी गेला असून या देशात कोरोनाने २८,१३१ जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाव्हायरसमुळे स्पेनमध्ये २५,१०० तर फ्रान्समध्ये २४,५९४ आणि बेल्जियममध्ये ७,७६५ जण दगावले आहेत. युरोपातील ब्रिटनवगळता इतर देशांनी लॉकडाउनचे नियम शिथिल करुन दोन दिवस उलटले आहेत. पण या दोन दिवसांमध्ये या देशांमधील कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढल्याची माहिती समोर येत आहे.

रशियामधील परिस्थिती अधिकच कठीण बनत चालली आहे. या देशात कोरोनाने १,२२२ जणांचा बळी गेला आहे. गेल्या चोवीस तासात या देशात कोरोनाचे तब्बल ९६२३ रुग्ण आढळले असून रशियातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या सव्वा लाखाजवळ पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात रशियाचे बांधकाममंत्री व्लादिमिर याकुशेव आणि त्यांचे सहाय्यक दिमित्री वोल्कोव यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. या व्यतिरिक्त मॉस्को शहरातील दोन मेयर्सना देखील कोरोनामुळे क्वारनटाईन करण्यात आले आहे. राजधानी मॉस्कोतील किमान दोन टक्के लोकसंख्येला या साथीची लागण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

leave a reply