१९ देश ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी उत्सुक

- जून महिन्यात महत्त्वाच्या निर्णयाची अपेक्षा

केप टाऊन – पाश्चिमात्य देशांचा प्रभाव नसलेल्या ‘ब्रिक्स’ या उदयोन्मुख देशांच्या संघटनेचे सदस्यत्व आपल्यालाही मिळावे, यासाठी तब्बल १९ देशांनी विचारणा केली आहे. येत्या जून महिन्यात दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या बैठकीत याबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला जाईल, अशी माहिती ब्रिक्सच्या राजदूतांनी दिली. त्याचबरोबर व्यापारात डॉलरचा वापर कमी करण्यावरही या बैठकीत चर्चा होणार असल्याचा दावा केला जातो.

१९ देश ब्रिक्सच्या सदस्यत्वासाठी उत्सुक - जून महिन्यात महत्त्वाच्या निर्णयाची अपेक्षारशिया, भारत, चीन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांचा गट म्हणून ‘ब्रिक्स’चा उल्लेख केला जातो. दोन वर्षांपूर्वीपर्यंत हा गट विस्तारण्याबाबत कुठल्याही प्रकारची चर्चा झाली नव्हती. पण गेल्या वर्षापासून लॅटिन अमेरिका, आफ्रिका, आखात व आग्नेय आशियाई देशांकडून या गटात सामील होण्यासाठी विचारणा सुरू झाली. गेल्या वर्षीच्या ब्रिक्सच्या बैठकीतही हा मुद्दा मांडण्यात आला होता.

येत्या २-३ जून रोजी दक्षिण आफ्रिकेच्या केप टाऊन शहरात ब्रिक्सच्या परराष्ट्रमंत्र्यांची विशेष बैठक पार पडत आहे. यावेळी ब्रिक्सच्या विस्तारावर महत्त्वाचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी माहिती ब्रिक्समधील दक्षिण आफ्रिकेचे राजदूत अनिल सुकलाल यांनी दिली. आत्तापर्यंत सौदी अरेबिया, इराण, युएई, अर्जेंटिना, अल्जेरिया, इजिप्त, बाहरिन आणि इंडोनेशिया यांच्यासह एकूण १३ देशांनी ब्रिक्समधील सदस्यत्वाबाबत थेट विचारणा केली आहे. तर सहा देशांनी अप्रत्यक्षरित्या ब्रिक्सच्या सदस्यत्वाची मागणी केली.

दरम्यान, ब्रिक्सचा हा विस्तार अमेरिका व युरोपिय देशांसाठी हादरा ठरू शकतो. दक्षिण आफ्रिकेतील या बैठकीत सहभाग घेण्यासाठी रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन उपस्थित राहिलेच, तर त्यांना अटक करण्याची तयारी अमेरिकेने केल्याचे दावे प्रसिद्ध झाले आहेत.

leave a reply