सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तानच्या लष्कराची भारताला धमकी

इस्लामाबाद – जम्मू व काश्मीरच्या पूंछमधील दहशतवादी हल्ल्यानंतर, भारत पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईक करील, या शक्यतेने पाकिस्तानला कापरे भरले आहे. त्यातच पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांनी भारताविरोधात आपले लष्कर टिकाव धरू शकणार नाही, याची कबुली दिल्याची बाब नव्याने समोर आली आहे. अशा परिस्थितीत पाकिस्तानचे लष्कर भारताविरोधात मोठमोठ्या गर्जना कशाच्या जोरावर करीत होते, असा प्रश्न या देशातूनच विचारला जात आहे. याला उत्तर देण्याचे सोडून पाकिस्तानच्या लष्कराने पुन्हा एकदा भारताला धमकी दिली. भारताने काश्मीरच्या एलओसीवर आगळीक केलीच, तर भारताच्या भूमीपर्यंत युद्ध नेण्याचा इशारा पाकिस्तानच्या लष्कराने दिला आहे.

सर्जिकल स्ट्राईकच्या भीतीने गाळण उडालेल्या पाकिस्तानच्या लष्कराची भारताला धमकीपाकिस्तानी लष्कराच्या ‘इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्स-आयएसपीआर’चे डायरेक्टर जनरलपदावर असलेले मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला धमकी दिली. जम्मू व काश्मीर कधीही भारताचा भूभाग नव्हता, यापुढेही हा भूभाग भारताला मिळणार नाही, असा दावा मेजर जनरल चौधरी यांनी केला. त्याचवेळी भारताने गैरसमजुतीतून एलओसीवर कुठल्याही प्रकारची आगळीक केलीच, तर पाकिस्तानचे लष्कर त्याला जबरदस्त प्रतिसाद देईल. हे युद्ध भारताच्या भूमीपर्यंत नेण्याची क्षमता पाकिस्तानच्या लष्कराकडे आहे, असा दावा मेजर जनरल चौधरी यांनी केला. उपासमार, बेरोजगारी, अन्नधान्याची व इंधनाची टंचाई या साऱ्यांनी ग्रासलेला पाकिस्तान आणखी किती काळ तग धरील, असा सवाल या देशाची माध्यमे विचारीत आहेत. अशा परिस्थितीत मेजर जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी भारताला दिलेली ही धमकी हास्यास्पद ठरते.

काही दिवसांपूर्वीच पाकिस्तानचे विख्यात पत्रकार हमीद मिर यांनी माजी लष्करप्रमुख जनरल बाजवा यांच्या विधानांचा दाखला दिला होता. भारताने हल्ला चढविलाच, तर पाकिस्तानच्या लष्कराकडे रणगाडे हलविण्यासाठी आवश्यक असलेले डिझेल देखील पुरेशा प्रमाणात नाही, याकडे जनरल बाजवा यांनी लक्ष वेधले. पाकिस्तानच्या लष्कराकडे भारताशी लढण्याची क्षमताच उरलेली नाही, असे परखड उद्गार जनरल बाजवा यांनी लष्करप्रमुख असतानाच काढले होते. म्हणूनच पाकिस्तानने भारताशी संघर्ष करण्यापेक्षा सामोपचाराचे धोरण स्वीकारावे, असा दावा जनरल बाजवा यांनी केला होता.

हमीद मिर यांनी दिलेल्या या माहितीनंतर पाकिस्तानात गदारोळ माजला. जनरल बाजवा यांनीच भारताने ३७० कलम हटविल्यानंतर शांत राहण्याचे धोरण स्वीकारले. त्यामुळे जम्मू व काश्मीरवर भारताने आपला दावा भक्कम केला. अन्यथा पाकिस्तानच्या लष्कराने भारताला सडेतोड प्रत्युत्तर दिले असते, असा तर्क पाकिस्तानातील बेताल पत्रकार व कट्टरपंथिय विश्लेषक मांडत आहेत. बाजवा यांनीच भारताशी हातमिळवणी केल्याचे सांगून त्यांच्यावर थेट देशद्रोहाचे आरोप पाकिस्तानच्या माध्यमांमधून केले जात आहेत. तर काही समंजस विश्लेषक बाजवा यांनी पाकिस्तानला परिस्थितीचे भान देण्याचा प्र्रयत्न केल्याचे सांगून त्यांचे समर्थन करीत आहेत.

अशा परिस्थितीत पाकिस्तानच्या लष्कराने आपल्या सामर्थ्याबाबत अतिशयोक्तीपूर्ण दावे करून भेदरलेल्या जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. पूंछमधील दहशतवादी हल्ल्यात भारताचे पाच जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारत याचा सूड घेण्यासाठी सर्जिकल स्ट्राईक करील, या भीतीने पाकिस्तानला ग्रासले होते. पण भारताने असे काही केलेच, तर आपण त्याला सडेतोड प्रत्युत्तर देऊ असे डीजी-आयएसपीआर सांगत आहेत. मात्र हा आत्मविश्वास पाकिस्तानी लष्करप्रमुखांच्या चीन दौऱ्यामुळे आलेला असण्याची दाट शक्यता आहे. कारण पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असिफ मुनीर सध्या चीनच्या दौऱ्यावर असून पाकिस्तान चीनसाठी या क्षेत्रातला सर्वात महत्त्वाचा देश असल्याचे आश्वासन चीनने जनरल मुनीर यांना दिले आहे. तसेच आर्थिक सहाय्याचे आश्वासन चीनने जनरल मुनीर यांना दिले आहे.

leave a reply