महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या 198 नव्या रुग्णांची नोंद दिल्ली, मुंबई, पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात

- तज्ज्ञांनी भीती व्यक्त केली

नवी दिल्ली/मुंबई – दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरात कोरोनाच्या ओमिक्रॉन व्हेरिअंटच्या समुह संसर्गाला अर्थात कम्युनिटी ट्रान्सफरला सुरूवात झाल्याची भीती तज्ज्ञांनी वर्तविली आहे. या शहरांमध्ये कोरोनाचे आतापर्यंत जेवढे रुग्ण समोर आले आहेत, त्यातील काही जणांची अलिकडील काळात प्रवास केल्याची कोणतीही नोंद नाहीत. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर इतर ओमिक्रॉन रुग्णांच्या संपर्कात आल्याने या व्हेरिअंटचा संसर्ग झाल्याचे लक्षात येते. यावरून हा अंदाज बांधला जात आहे.

महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या 198 नव्या रुग्णांची नोंद दिल्ली, मुंबई, पुण्यात ओमिक्रॉनच्या समूह संसर्गाला सुरुवात - तज्ज्ञांनी भीती व्यक्त केलीदेशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1200 पोहोचली आहे. गुरुवारी महाराष्ट्रात ओमिक्रॉनच्या 198 रुग्णांची नोंद झाली. यामुळे महाराष्ट्रातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 450 वर पोहोचली आहे. यातील 190 ओमिक्रॉन रुग्ण एकट्या मुंबईत आढळले आहेत. ठाण्यात दोन, सातारा, नांदेड, पुणे शहर व पुणे ग्रामीणमध्ये प्रत्येक एका रुग्णाची नोंद झाली आहे. यामुळे देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या 1200वर पोहोचली आहे.

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आलेले कोरोना रुग्णांचे अहवाल जसे येत आहे, तशी देशातील ओमिक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढल्याचे दिसून येत आहे. मात्र जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविलेल्या नमुन्यामधून ओमिक्रॉनच्या व्हेरिअंटच्या रुग्णांची टक्केवारी पाहता व यामध्ये परदेश प्रवास न केलेल्या रुग्णांची संख्या लक्षात घेऊन तज्ज्ञांनी काही निष्कर्ष काढले आहेत. यानुसार दिल्ली, मुंबई, पुण्यासारख्या शहरामध्ये ओमिक्रॉनचा समुह संसर्ग सुरू झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

पुण्याच्या ‘इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन`मध्ये (आयआयएसईआर) जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये ओमिक्रॉन झाल्याचे निष्पन्न झालेल्यांपैकी काही जणांनी प्रवास केल्याची कोणतीही नोंद नाही. 21 डिसेंबरपासून बुधवारपर्यंत असे 38 ओमिक्रॉन रुग्ण आयआयएसईआरमधील चाचण्यांमध्ये आढळले होते. यातील 19 रुग्ण हे मुंबईतील होते. कुलाबा, ताडदेव, गिरगाव, वरळी, बांद्रा, खारमध्ये हे रुग्ण सापडले आहेत. यामध्ये 16 जणांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नव्हती, तर आठ जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतलेले आहेत.

एका अहवालानुसार या 38 जणांपैकी 12 जणांनी अलिकडेच मुंबईत विधानभवनात पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात हजेरी लावली होती. विधानभवनाच्या आवारात कोरोनाच्या चाचण्या घेण्यात आल्या होत्या. चार हजार चाचण्यांमध्ये 43 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले होते. हे नमूने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आले होते.

तर नवी मुंबई आणि पिंपरी चिंचवडमध्ये प्रत्येक तीन ओमिक्रॉन रुग्णांचा या 38 जणांमध्ये समावेश आहे. तसेच वसई, विरार, पुणे महापालिका क्षेत्रातील प्रत्येक दोन रुग्ण आणि पुणे ग्रामीण, भिवंडी-निझामपूर, पनवेल आणि ठाण्यामध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. यावरून आयआयएसईआरच्या तज्ज्ञांनी समूह संसर्गाची भिती व्यक्त केली आहे. हे प्राथमिक निदान असल्याची माहिती आयआयएसईआर अधिकाऱ्यांनी दिली. मात्र ओमिक्रॉनचा प्रसार वाढत असला, तरी या व्हेरिअंटच्या रुग्णांना ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची गरज कमी भासत आहे, ही दिलासादायक बाब असल्याचे तज्ज्ञांनी म्हटले आहे.

त्याचवेळी दिल्लीचे आरोग्यमंत्री सत्यंद्र जैन यांनी दिल्लीत जिनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठविण्यात आलेल्या नमून्यापैकी 46 टक्के जणांना ओमिक्रॉन झाल्याचे लक्षात आल्याची माहिती दिली. तसेच यातील काही रुग्णांनी अलिकडील काळात कोणताही प्रवास केलेला नाही. यावरून ओमिक्रॉनचा समूह संसर्ग सुरू झाल्याचे लक्षात येते, असा दावा केला आहे.

leave a reply