म्यानमारमधील लष्कराच्या कारवाईत सुमारे अडीच लाख विस्थापित

- युरोपपाठोपाठ अमेरिकेचेही म्यानमारवर नवे निर्बंध

ब्रुसेल्स/वॉशिंग्टन/यंगून – १ फेब्रुवारीपासून म्यानमारमध्ये लष्कराने लोकशाहीवादी निदर्शकांविरोधात सुरू केलेल्या कारवाईमुळे अडीच लाख जण विस्थापित झाले आहेत. याशिवाय लष्कराने ३,२६१ जणांना राजकीय बंदी करून घेतल्याची टीका संयुक्त राष्ट्रसंघाच्या विशेषदूतांनी केली आहे. दरम्यान, म्यानमारच्या लष्कराने अटक केलेल्या सहा निदर्शकांचे फोटो प्रसिद्ध केले आहेत. यामध्ये निदर्शकांवर केलेले अत्याचार स्पष्टपणे दिसत असल्याचा आरोप करून मानवाधिकार संघटना आंतरराष्ट्रीय समुदायाकडे जुंटा राजवटीविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

म्यानमारमध्ये मानवतावादी संकट उभे राहिल्याचा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या मानवाधिकार गटाचे विशेषदूत टॉम अँड्ˆयूज् यांनी दिला आहे. गेल्या दहा आठवड्यांपासून म्यानमारच्या लष्कराकडून आपल्याच जनतेवर कारवाई केली जात असल्याची टीका टॉम यांनी केली. या कारवाईत आत्तापर्यंत ७३८ जणांचा बळी गेला आहे. तर जवळपास अडीच लाख जण विस्थापित झाले असून काही जणांनी शेजारच्या देशांमध्ये आश्रयासाठी धाव घेतल्याची माहिती टॉम यांनी दिली.

येत्या शनिवारी इंडोनेशियाची राजधानी जकार्तामध्ये आग्नेय आशियाई देशांची ‘असियान’ची बैठक होत आहे. म्यानमारचे लष्करप्रमुख या बैठकीत उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे लष्कराने लोकशाहीवादी निदर्शकांवरील कारवाई थांबविल्याचा आरोप टॉम तसेच स्थानिक मानवाधिकार संघटना करीत आहेत. पण असियान देशांनी तसेच आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या लष्करावर कठोर कारवाई करावी, अशी मागणी टॉम यांनी संयुक्त केली आहे.

दोन दिवसांपूर्वी युरोपिय महासंघाने म्यानमारच्या लष्कराचे अधिकारी आणि संबंधित कंपन्यांवर निर्बंध लादले होते. बुधवारी अमेरिकेने देखील म्यानमारच्या लष्कराशी संबंधित दोन कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले. याआधी देखील अमेरिकेने जुंटा राजवटीवर निर्बंधांची घोषणा केली होती. पण या निर्बंधांव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय समुदायाने म्यानमारच्या लष्करी राजवटीविरोधात कठोर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रसंघातील म्यानमारचे राजदूतच करीत आहेत.

दरम्यान, म्यानमारच्या लष्करी राजवटीला आता स्थानिकांकडूनच आव्हान मिळत असल्याचा दावा केला जातो. ‘काचिन इंडिपेंडन्स आर्मी’ या सशस्त्र बंडखोर गटाने म्यानमारच्या लष्कराविरोधात काचिन प्रांतात जोरदार हल्ले सुरू केल्याच्या बातम्या समोर येत आहेत.

तर आठवड्यापूर्वी लष्कराच्या हल्ल्याचे लक्ष्य ठरलेल्या काले शहरातील तरुणांनी देखील सशस्त्र उठावाची तयारी केल्याचा दावा केला जातो.

leave a reply