कॅमेरूनमधील दहशतवादी हल्ल्यात आठ मुलांसह २२ जणांचा बळी

याऔंदे – आफ्रिकेतील कॅमेरूनमध्ये ‘बोको हराम’ या दहशतवादी संघटनेने केलेल्या हल्ल्यांमध्ये २२ जणांचा बळी गेला असून सहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. बळींमध्ये आठ मुलांसह लष्कराच्या चार जवानांचाही समावेश आहे. बोको हरामकडून कॅमेरूनला लक्ष्य करण्याची या आठवड्यातील ही दुसरी वेळ आहे. गेल्या महिन्यात ‘बोको हराम’ने आफ्रिकी देशांमध्ये जवळपास १८ दहशतवादी हल्ले घडवून १००हून अधिक जणांचा बळी घेतला होता.

शुक्रवारी बोको हरामने कॅमेरूनच्या उत्तर व पश्‍चिम भागात दहशतवादी हल्ले चढविले. उत्तर कॅमेरूनमध्ये ‘मायो-सनागा’ भागातील मोझोगो गावात दहशतवाद्यांनी हल्ला चढविला. यावेळी काही गावकर्‍यांनी हल्ल्यापासून पळ काढून जवळच्या जंगलात लपण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका महिला आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडविला. दहशतवाद्यांनी केलेला हल्ला व आत्मघाती स्फोटात १४ जणांचा बळी गेला आहे. त्यात आठ मुलांचा समावेश असल्याची माहिती गावातील प्रमुख अधिकार्‍यांनी दिली. हल्ला करणारे दहशतवादी नायजेरियामधून आल्याचा दावा केला जातो.

दुसर्‍या हल्ल्यात दहशतवाद्यांनी पश्‍चिम कॅमेरूनमधील मर्तझेन भागातील लष्करी चौकीला लक्ष्य केले. जवळपास ३० ते ४० मिनिटे दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरू होता, अशी माहिती हल्ल्यात जखमी झालेल्यांनी दिली. या हल्ल्यात लष्कराच्या चार जवानांसह आठजणांचा बळी गेला आहे. बोको हरामच्या हल्ल्यात अनेक जण जखमी झाल्याचे सांगण्यात येते. मात्र स्थानिक अधिकार्‍यांनी चार ते पाच जण जखमी झाल्याचे म्हटले आहे.

बोको हरामने या आठवड्यात कॅमरूनवर दहशतवादी हल्ला करण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी रविवारी उत्तर कॅमेरूनमध्ये दोन दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. त्यात चार नागरिकांचा बळी गेला होता. या हल्ल्यानंतर लष्कराने केलेल्या कारवाईत बोको हरामच्या तीन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते, तर दोघांना अटक करण्यात आली होती.

गेल्या दोन वर्षात आफ्रिकेत दहशतवादी संघटना पुन्हा एकदा प्रबळ होत असल्याचे समोर येत आहे. पूर्व आफ्रिकेत ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेकडून सोमालिया व केनिया या देशांमध्ये वाढते दहशतवादी हल्ले होत आहेत. तर पश्‍चिम तसेच मध्य आफ्रिकेत ‘बोको हराम’ ही दहशतवादी संघटना प्रभाव वाढविताना दिसत आहे. इजिप्तमधील एका गटाने या दहशतवादी संघटनांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत अहवाल प्रसिद्ध केला होता.

या अहवालानुसार, डिसेंबर महिन्यात ‘अल शबाब’ व ‘बोको हराम’ या दोन दहशतवादी संघटनांनी आफ्रिकेत ४० दहशतवादी हल्ले घडविले आहेत. या हल्ल्यांमध्ये सुमारे १५० जणांचा बळी गेल्याचे मानले जाते. सर्वाधिक २२ हल्ले ‘अल शबाब’कडून घडविण्यात आले असून ‘बोको हराम’ने १८ हल्ले केल्याचे सांगण्यात येते. ‘बोको हराम’च्या हल्ल्यांमध्ये झालेली जीवितहानी जास्त असल्याचेही इजिप्शियन गटाने म्हटले आहे.

डिसेंबर महिन्यात बोको हरामने नायजेरिया, नायजर व कॅमेरून या देशांमध्ये हल्ले केले असून त्यात सुमारे १०० जणांचा बळी गेला आहे. ‘अल शबाब’ व ‘बोको हराम’व्यतिरिक्त ‘आयएस’संलग्न दहशतवादी संघटनाही आफ्रिकेत सक्रिय असून त्या प्रामुख्याने सुरक्षायंत्रणांना लक्ष्य करीत असल्याचे उघड झाले आहे.

leave a reply