ब्रिटनची एफ-३५ लढाऊ विमाने ‘स्पिअर’ क्षेपणास्त्रांनी सज्ज होणार

लंडन – आपल्या नौदलातील ‘एफ-३५बी’ स्टेल्थ विमानांना अतिप्रगत क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्याचा निर्णय ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने घेतला आहे. यासाठी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने ‘स्पिअर थ्री’ या क्रूझ् क्षेपणास्त्रांच्या खरेदीचा करार केला. ‘एफ-३५बी’ विमाने या क्रूझ क्षेपणास्त्रांनी सज्ज झाल्यास शत्रूच्या विमानवाहू युद्धनौका, विनाशिका, पाणबूड्या आणि क्षेपणास्त्रांनाही प्रत्युत्तर देता येईल, असा दावा ब्रिटनची माध्यमे करीत आहेत. तर गेल्या काही महिन्यांपासून रशियाची वाढत असलेली लष्करी आक्रमकता पाहता, ब्रिटन देखील आपली संरक्षणसज्जता वाढवित असल्याचे लष्करी विश्‍लेषकांचे म्हणणे आहे.

ब्रिटनच्या नौदलात ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ आणि ‘एचएमएस प्रिन्स ऑफ वेल्स’ या दोन विमानवाहू युद्धनौका आहेत. या युद्धनौकांवरील तैनातीसाठी ब्रिटनने अमेरिकेकडून ‘एफ-३५बी’ या स्टेल्थ लढाऊ विमानांची खरेदी केली आहे. अतिप्रगत रडार यंत्रणा, सेन्सर्सनी सज्ज असलेल्या या लढाऊ विमानांना तिसर्‍या श्रेणीतील क्षेपणास्त्रांनी सज्ज करण्यासाठी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाचे गेल्या काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. यासाठी ब्रिटनचे संरक्षण मंत्रालय आणि ‘एमबीडीए’ या फ्रान्स स्थित युरोपिय संरक्षणसाहित्यांची निर्मिती करणार्‍या कंपनीमध्ये चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली होती.

गुरुवारी ब्रिटनच्या संरक्षण मंत्रालयाने ‘एमबीडीए’सह ७५ कोटी डॉलर्सचा करार केल्याची घोषणा केली. या कराराप्रमाणे ‘एमबीडीए’ ब्रिटनच्या ‘एफ-३५बी’ लढाऊ विमानांसाठी ‘स्पिअर थ्री’ क्रूझ् क्षेपणास्त्रांचा पुरवठा करणार आहे. सबसोनिक वेगाने प्रवास करणारी ही क्षेपणास्त्रे ‘नेक्स्ट जनरेशन’ असल्याचा दावा केला जातो. ‘एफ-३५बी’ विमाने या क्षेपणास्त्रांनी सज्ज झाल्यास ब्रिटीश जवान आणि लष्कराची ठिकाणे व हितसंबंधांची सुरक्षा करणे अधिक सोपे होईल. यासाठी ‘एफ-३५बी’ क्षेपणास्त्रांना जोखीम पत्करण्याची आवश्यकताही उतरणार नसल्याचा दावा ब्रिटनने केला.

हवेतून जमिनीवर मारा करणारे ‘स्पिअर थ्री’ क्षेपणास्त्र १४० किलोमीटर पल्ल्यापर्यंत मारा करू शकते. त्याचबरोबर या क्षेपणास्त्रामध्ये गतिमान लक्ष्य करण्याची देखील क्षमता आहे. या क्षेपणास्त्रांमुळे ‘एफ-३५बी’च्या मारक क्षमतेत तर ब्रिटनच्या नौदलाच्या सामर्थ्यात वाढ होईल, असा दाव ब्रिटनची माध्यमे करीत आहेत. सध्या ब्रिटनचे नौदल २१ ‘एफ-३५बी’ लढाऊ विमानांनी सज्ज आहे. येत्या वर्षअखेरीस सदर विमाने ‘एचएमएस क्विन एलिझाबेथ’ या विमानवाहू युद्धनौकेवर तैनात करून पहिल्या सागरी मोहिमेसाठी रवाना होणार आहेत. दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून ब्रिटनने आपल्या संरक्षण सज्जतेत तसेच लष्करी धोरण आक्रमक केले आहे. चीन आणि रशियाच्या वाढत्या धोक्याच्या पार्श्‍वभूमीवर ब्रिटनच्या संरक्षण सज्जतेत वाढ होत असल्याचा दावा लष्करी विश्‍लेषक करीत आहेत.

leave a reply