एप्रिल ते डिसेंबरदरम्यान देशातील थेट परकीय गुंतवणुकीमध्ये 22 टक्क्यांची वाढ

22 टक्क्यांची वाढनवी दिल्ली – 2020-21 या आर्थिक वर्षात पहिल्या नऊ महिन्यात भारतात झालेल्या थेट परकीय गुंतवणुकीमध्ये (एफडीआय) 22 टक्क्यांची वाढ झाली आहे. या नऊ महिन्यात देशात 67.54 अब्ज डॉलर्स इतकी थेट परकीय गुंतवणूक झाल्याची माहिती वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. याआधीच्या आर्थिक वर्षात याच काळात देशात 55.14 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गंतवणुक झाली होती.

Advertisement

कोरोनाच्या काळात कित्येक देशांमध्ये गुंतवणूक आटली असताना, कित्येक मोठ्या अर्थव्यवस्था ‘एफडीआय’ खेचण्यात असमर्थ ठरत असताना भारतावर मात्र गुंतवणूकदार विश्‍वास दाखवत आहेत. वाणिज्य मंत्रालयाकडून जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्ट होत आहे. एप्रिल ते डिसेंबरच्या या नऊ महिन्यात 67.45 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक झाली.

इक्विटीमधील ‘एफडीआय’ सर्वाधिक प्रमाणात आला आहे. इक्विटी रुपात ‘एफडीआय’ गुंतवणूक 51.47 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. तेच 2019-20 या आर्थिक वर्षात हाच ‘एफडीआय’ 36.77 अब्ज डॉलर्स होता. यावरुन ‘एफडीआय’ इक्विटीमध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाल्याचे स्पष्ट होते. चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहित एकूण 26.16 अब्ज डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे वाणिज्य व उद्योगमंत्रालयाने म्हटले आहे.

‘एफडीआय’मध्ये झालेली ही वाढ सरकारने राबविलेल्या सुधारणा कार्यक्रम, प्रोत्साहन योजना, व्यापार सुलभ धोरणांचा परिणाम असल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या सहा महिन्यात भारतात गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी ज्या योजना आणि सुधारणा करण्यात आल्याची, त्याची रसाळ फळे मिळत असल्याचे वाढलेल्या ‘एफडीआय’वरून दिसून येते, असे वाणिज्य मंत्रालयाने म्हटले आहे.

कोरोनाच्या साथीसाठी जबाबदार असलेल्या चीनमधून कित्येक देशांचे व्यापारी संबंध बिघडले आहेत. चीनमधून गुंतवणूक काढून बहुराष्ट्रीय कंपन्या आपले कारखाने इतर देशात हलवत असताना या संधीचा लाभ घेण्यासाठी भारत सरकारने विविध उपाययोजना केल्या होत्या. हा सुधारणा कार्यक्रम सतत सुरू आहे. पुढील काळात यामुळे अर्थव्यवस्थेला अधिक गती मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केला जातो.

leave a reply