इस्रायल इराणच्या अणुप्रकल्पांवरील हल्ल्याचा ‘प्लॅन अपडेट’ करीत आहे

- इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांचा इशारा

जेरूसलेम – ‘इराणच्या अणुप्रकल्पाशी संबंधित ठिकाणांवर हल्ले चढविण्याचा ‘प्लॅन’ इस्रायल ‘अपडेट’ करीत आहे. इराणची अणुबॉम्ब निर्मितीची क्षमताच नष्ट करता येईल, असे लक्ष्य इस्रायलने निश्‍चित करून ठेवलेले आहे’, असा इशारा इस्रायलचे संरक्षणमंत्री बेनी गांत्झ यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीशी बोलताना दिला. आंतरराष्ट्रीय समुदायाने इराणची अण्वस्त्रनिर्मिती रोखली तर ठीक अन्यथा इस्रायल स्वतंत्रपणे इराणला रोखेल, असे सांगून इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी अमेरिकेला संदेश दिला आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन इराणबरोबर नव्याने अणुकरार करण्याच्या तयारीत आहेत. यासाठी अमेरिकेने इराणसमोर चर्चेचा प्रस्ताव ठेवला आहे. यावर इस्रायलकडून तीव्र आक्षेप घेण्यात येत आहेत. अणुकरार करून इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखता येणार नाही. उलट अणुकरारावरील वाटाघाटींच्या आड इराण अण्वस्त्रनिर्मितीच्या दिशेने वेगाने पावले टाकत असल्याचे इस्रायलने बजावले आहे. पण इस्रायलच्या इशार्‍यानंतरही अमेरिका इराणबरोबरील अणुकरारावर ठाम आहे.

या पार्श्‍वभूमीवर, अमेरिकन वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत इस्रायलचे संरक्षणमंत्री गांत्झ यांनी इराणवरील हल्ल्याचा ‘प्लॅन अपडेट’ करीत असल्याचा इशारा दिला. त्याआधी, ‘आंतरराष्ट्रीय समुदाय इराणला अण्वस्त्रसज्जतेपासून रोखण्यात यशस्वी ठरली तर इस्रायलच्या कारवाईची आवश्यकता भासणार नाही. पण जर असे झाले नाही, तर मग इस्रायलला स्वसंरक्षणासाठी स्वतंत्रपणे इराणवर कारवाई करावी लागेल’, असे गांत्झ यांनी बजावले.

‘इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी या देशाच्या प्रमुख ठिकाणांना लक्ष्य करण्याचे इस्रायलने निश्‍चित केले आहे’, असे इस्रायलच्या संरक्षणमंत्र्यांनी या मुलाखतीत सांगितले. त्याचबरोबर इराणवरील हल्ल्याची योजना अपडेट केली जात असल्याचे संरक्षणमंत्री गांत्झ म्हणाले. ‘शत्रूच्या ठिकाणांवरील हल्ल्याच्या योजना ह्या कधीही निश्‍चित नसतात. त्यामध्ये वेळोवेळी, क्षेत्रीय घडामोडींनुसार बदल केले जातात. अगदी हल्ल्याच्या आधी देखील या योजनांमध्ये बदल होत असतो. यामध्ये अत्युच्च स्तरावर सुधारणा केल्या जातात’, असे गांत्झ म्हणाले.

अण्वस्त्रनिर्मिती व्यतिरिक्त इराणने लेबेनॉन आणि सिरियातील आपल्या दहशतवादी संघटनांद्वारे इस्रायलवर हल्ल्याची योजना आखल्याचा आरोप संरक्षणमंत्री गांत्झ यांनी केला. ‘इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणांकडे इराणच्या या कटाची पूर्ण माहिती आहे. इस्रायलवरील हल्ल्यासाठी इराणचा पाठिंबा असलेल्या हिजबुल्लाहने लेबेनॉनच्या नागरी वस्त्यांमध्ये हजारो क्षेपणास्त्रे दडवून ठेवली आहेत’, असे सांगून गांत्झ यांनी अमेरिकी वृत्तवाहिनीला हिजबुल्लाहने लपविलेल्या क्षेपणास्त्रांची माहिती नकाशासह दाखविली.

‘हिजबुल्लाहच्या या क्षेपणास्त्रांच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी इस्रायलने तयारी केली आहे. येत्या वर्षभरात हिजबुल्लाहबरोबर संघर्ष भडकण्याची पूर्ण शक्यता आहे. या संघर्षात प्रत्येक दिवशी लेबेनॉनमधील हिजबुल्लाहच्या 3000 ठिकाणांना लक्ष्य करण्याची तसेच दर 24 तासात हिजबुल्लाहचे 300 दहशतवादी ठार करण्याची योजनाही इस्रायलच्या लष्कराने तयार ठेवलेली आहे’, अशी माहिती गांत्झ यांनी दिली. तसेच सिरियातील इराण व इराणसंलग्न ठिकाणांवरील इस्रायलचे हल्ले यापुढेही सुरू राहतील, असे गांत्झ म्हणाले.

leave a reply