गोव्यातील रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत विदेशी नागरिकांसह २३ जणांना अटक

- नऊ लाखांचे अमली पदार्थ जप्त

पणजी- गोव्यात शनिवारी रात्री एका रेव्ह पार्टीवर गोवा क्राईम ब्रॅंच पोलिसांनी छापा टाकून मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त केले आहेत. या कारवाईत २३ जणांना अटक केली असून त्यात तीन विदेशी महिलांचा समावेश आहे. कोरोनाचा फैलाव होऊ नये म्हणून सरकारकडून नागरिकांच्या हालचालींवर निर्बंध टाकण्यात आले आहेत. पण या त्याकडे दुर्लक्ष करून गोव्यात अशा बेकायदा पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचे समोर आले आहे.

गोव्यातील रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत विदेशी नागरिकांसह २३ जणांना अटकगोव्याच्या वागाटोर येथील फिरंगीपानी व्हिलामध्ये शनिवारी रात्री रेव्ह पार्टी आयोजित करण्यात आली होती. याची खबर गोवा क्राईम ब्रँचच्या पोलिसांना मिळाली. त्यानंतर त्यांनी सापळा रचून या रेव्ह पार्टीवर धाड टाकली. यावेळी पोलिसांना पार्टीच्या आयोजकांसह २३ जणांना पकडण्यास यश आले. रेव्ह पार्टीत सुमारे नऊ लाख रुपयांहून अधिक मूल्याचे अमली पदार्थ पोलिसांनी जप्त केले. त्यात ‘एक्स्टेसी’ ह्या घातक अमली पदार्थाच्या गोळ्या, ‘एमडीएमए’ व कोकेनचा समावेश आहे.

दोन रशियन्ससह झेक रिपब्लिकच्या महिलांनी ह्या रेव्ह पार्टीचे आयोजन केल्याचे समोर आले आहे. या तीनही महिलांवर ‘नार्कोटिक ड्रग्ज ॲण्ड सायकोट्रॉपिक सबस्टन्सेस’च्या (एनडीपीएस) आरोपाखाली गुन्हा दाखल झाला आहे. सार्वजनिक ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता पार्टीला आलेल्या इतरांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत सहभागी असलेल्या इतर संशयितांचाही तपास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले. गोव्याचे पोलीस महासंचालक मुकेश कुमार मीना यांनी ट्विट करून पोलिसांच्या कारवाईची माहिती दिली.

गोव्यातील रेव्ह पार्टीवर टाकलेल्या धाडीत विदेशी नागरिकांसह २३ जणांना अटककोरोनाव्हायरसमुळे गोव्याच्या पर्यटन क्षेत्राचे खूप मोठे नुकसान झाले आहे. अशा वेळी पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी छोट्या रेव्ह पार्ट्यांचे आयोजन होत असल्याचे सांगितले जाते. काही दिवसांपूर्वी गोव्यात उच्चभ्रू वर्गातल्या तरूणांनी आयोजित केलेल्या अशा पार्टीवरही कारवाई करण्यात आली होती. या तरूणांच्या आयोजकांशी झालेल्या कडाक्याच्या भांडणानंतर पोलिसांना पार्टीची माहिती मिळाली होती.

राजधानी दिल्लीतही सोशल डिस्टन्सिंगचे नियम न पाळता अशा पार्ट्याचे आयोजन होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्याभरात दिल्लीत अशा पार्ट्याचे आयोजन करणाऱ्या आयोजकांसह ७२ जणांना अटक केली होती. यावेळी मोठया प्रमाणावर अमली पदार्थांचा साठाही जप्त करण्यात आला होता.

leave a reply