तर इस्रायललाही बैरुतसारखी भीषण किंमत मोजावी लागेल

-हिजबुल्लाह प्रमुखाचा इस्रायलला इशारा

बैरुत – दहा दिवसांपूर्वी लेबेनॉनची राजधानी बैरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली स्फोटासाठी इस्रायल जबाबदार असल्याचे समोर आले तर इस्रायलला बैरुतसारखीच मोठी किंमत चुकती करावी लागेल, असा इशारा हिजबुल्लाह प्रमुख हसन नसरल्ला याने दिला. या व्यतिरिक्त सिरियातील हल्ल्याचाही इस्रायलवर सूड उगवणार असल्याचे नसरल्लाने जाहीर केले. त्यामुळे बैरुत स्फोट व सिरियातील हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, हिजबुल्लाहने इस्रायलवर हल्ल्याची तयारी करीत असल्याचे संकेत मिळत आहेत.

तर इस्रायललाही बैरुतसारखी भीषण किंमत मोजावी लागेल४ ऑगस्ट रोजी बैरुतच्या बंदरात झालेल्या स्फोटामध्ये २०० हून अधिक जणांचा बळी गेला असून हजारो जण जखमी झाले आहेत. या स्फोटाची चौकशी सुरू असून बंदरात साठा केलेल्या २७५० टन अमोनियम नायट्रेटमुळे हा स्फोट झाल्याचे उघड झाले आहे. लेबेनीज सरकार तसेच यंत्रणांच्या बेफिकीरीमुळे ही दुर्घटना घडल्याचे प्राथमित तपासातून उघड झाले आहे. तरीही हिजबुल्लाहचा प्रमुख हसन नसरल्ला याने बैरुतच्या स्फोटासाठी इस्रायल जबाबदार असल्याचा ठपका ठेवला. ’गोदामात आग भडकवून किंवा छोटा बॉम्बस्फोटच्या सहाय्याने मोठा स्फोट घडविल्याची शक्यता नाकारता येत नाही. या स्फोटाचा अंतिम चौकशी अहवाल अजून समोर यायचा आहे. पण या चौकशीतून सदर स्फोटासाठी इस्रायल जबाबदार असल्याचे निष्पन्न झाले तर फक्त हिजबुल्लाहच नाही तर संपूर्ण लेबेनॉन इस्रायलला उत्तर देईल. या गुन्ह्यासाठी इस्रायलला बैरुत इतकीच मोठी किंमत चुकती करावी लागेल’, असे नसरल्लाने धमकावले.

बैरुतचा स्फोटच नाही तर सिरियातील आपल्या कमांडरवर झालेल्या हल्ल्यासाठी देखील इस्रायलवर हल्ला चढविणार असल्याचे हिजबुल्लाहच्या प्रमुखाने जाहीर केले. इराणचे परराष्ट्रमंत्री जावेद झरीफ यांनी नुकतीच लेबेनॉनला भेट दिली. त्यांच्या या भेटीनंतर पुढच्या काही तासातच नसरल्लाने इस्रायलला उद्देशून धमकावले आहे. त्यामुळे नसरल्लाच्या या धमकीमागे इराण असल्याचा दावा केला जातो. त्याचबरोबर या धमकीसह हिजबुल्लाहने इस्रायलविरोधी हल्ल्याची तयारी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. इस्रायलने गेल्या महिन्यातच आपल्या लष्कराला लेबेनॉनच्या सीमेजवळ तैनात करुन युद्धसज्ज राहण्याचे आदेश दिले होते. त्याचबरोबर हिजबुल्लाहची इस्रायलच्या विरोधातील एक चूक संपूर्ण लेबेनॉनला भारी पडेल’, असे इस्रायलने बजावले होते.

बैरुतमधील स्फोटासाठी बाह्यशक्ति जबाबदार असल्याचा आरोप करुन लेबेनॉनचे राष्ट्राध्यक्ष मिशेल एऑन इस्रायलकडे संकेत केले होते. इस्रायलला जबाबदार धरुन लेबेनीज राष्ट्राध्यक्ष हिजबुल्लाहचा बचाव करीत असल्याचा आरोप लेबेनीज जनतेने केला होता. तर हिजबुल्लाहचे माजी प्रमुख सुभी अल-तुफायली यांनी देखील बैरुतच्या स्फोटासाठी नसरल्ला जबाबदार असल्याचा ठपका ठेवला होता. त्याचबरोबर या स्फोटाप्रकरणी लेबेनीज राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान तसेच बड्या नेत्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी तुफायली यांनी केली होती. हिजबुल्लाहच्या बड्या नेत्यानेच हा आरोप केल्यामुळे खळबळ उडाली होती.

दरम्यान, बैरुतमधील स्फोटासाठी इस्रायलवर दोष ठेवल्यानंतर हिजबुल्लाह प्रमुख नसरल्लाने इस्रायल आणि संयुक्त अरब अमिरात (युएई) यांच्यात झालेल्या ऐतिहासिक शांतीकरारावरही टीका केली. इस्रायलशी हा करार करुन युएई’ने पॅलेस्टिनी व अरब जनतेशी दगाबाजी केल्याचा आरोप नसरल्लाने केला.

leave a reply