अमेरिकेत चोवीस तासात कोरोनाचे २४९४ बळी

वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात कोरोनाव्हायरसमुळे अमेरिकेतील २४९४ जणांचा बळी गेला असून या देशातील एकूण बळींची संख्या ५३,६९४ वर पोहोचली आहे. तर या साथीने जगभरातील दगावलेल्यांची संख्या २,०३,५०० च्या पुढे गेली आहे. युरोपिय देशांमध्ये या साथीमुळे १,२१,५२७ जणांचा मृत्यू झाला. तर अमेरिका आणि युरोपिय देश वगळता जगभरात या साथीने २५ हजाराहून अधिक जण दगावले आहेत.

शनिवारी अमेरिकेत या साथीने जवळपास अडीच हजार जणांचा बळी घेतला तर या देशात कोरोनाच्या साथीचे सुमारे ५० हजार नवे रुग्ण सापडले आहेत. अमेरिकेतील या साथीच्या रुग्णांची एकूण संख्या नऊ लाख सत्तर हजारांवर पोहोचली आहे. येत्या चोवीस तासात या देशातील कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या दहा लाखांवर पोहोचेल, असा दावा केला जातो. आतापर्यंत अमेरिकेत ५३ लाख जणांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे.

या साथीने ब्रिटनमध्ये गेल्या चोवीस तासात ८१३ जण दगावले असून या देशातील एकूण बळींची संख्या जवळपास २१ हजारांवर गेली आहे. सध्या ब्रिटनमध्ये या साथीचे दीड लाख रुग्ण आहेत. लवकरच ब्रिटनमधील कोरोनाच्या चाचणीचे प्रमाण वाढविले जाणार आहे. त्यामुळे या देशातील कोरोनाबाधितांची संख्या वाढेल, असा दावा केला जातो. गेल्या चोवीस तासात इटलीमध्ये या साथीने ४१५ तर स्पेनमध्ये २८८ जणांचा बळी घेतला आहे. बळींची संख्या घटत असताना स्पेनने आपल्या नागरिकांना मॉर्निंग वॉकची परवानगी दिली असून हळुहळू लॉकडाउन शिथिल करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.

leave a reply