मुंबईत २६/११ प्रमाणे हल्ल्याची धमकी

सुरक्षा यंत्रणा हाय ॲलर्टवर

* सुरक्षा यंत्रणा हाय ॲलर्टवर
* सागर कवच’ ऑपरेशन हाती

मुंबई – २००८ साली मुंबईत झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याप्रमाणे हल्ला घडविण्याची धमकी देणारा संदेश मुंबई पोलिसांना मिळाला आहे. भारतात मोठा हल्ला घडविण्याचे प्रयत्न निरनिराळ्या दहशतवादी संघटना करीत आहेत. गेल्या काही दिवसात देशभरात कित्येक टेरर मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आली आहेत. या पार्श्वभूमीवर देशाच्या आर्थिक राजधानीला पुन्हा लक्ष्य करण्याच्या आलेल्या धमकीचे गांभीर्य वाढले आहे. पोलिसांना हा धमकीचा संदेश ज्या फोनवरून आला तो क्रमांक पाकिस्तानातील असून मुंबई पोलिसांनी ‘सागर कवच’ ऑपरेशन हाती घेतल्याची माहिती मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी दिली.

शुक्रवारी रात्री मुंबई ट्रॅफिक पोलिसांच्या हेल्पलाईनच्या वॉटस्‌‍ॲप क्रमांकावर काही संदेश मिळाले. हा वॉटस्‌‍ॲप क्रमांक ट्रॅफिक पोलिसांनी तक्रारीसाठी जारी केलेला आहे. या क्रमांकावर हे धमकीचे संदेश आले.

threat-attack‘मुंबईवर हल्ला होणार आहे. २६/११ च्या हल्ल्याची आठवण करून देऊ’ अशी धमकी देण्यात आली आहे. संदेश पाठविणाऱ्याने यानंतर हा मोबाईल क्रमांकही शेअर केला आहे. मुंबई उडविण्याची आमची तयारी सुरू आहे. मी पाकिस्तानी आहे. मात्र काही भारतीय माझ्यासोबत आहेत, त्यांना मुंबई उडवायची आहे, असे या संदेशात म्हटले आहे. तसेच काही जणांची नावेही या संदेशात लिहिण्यात आली आहे, ज्यांची मदत घेतली जाणार असल्याचे या संदेशात म्हटले आहे. ‘हल्ल्याची तयारी झाली असून फक्त काही वेळ बाकी आहे. ही धमकी नाही, तर सत्य आहे. माझे लोकेशन भारताबाहेर ट्रेस होईल. मात्र हल्ला मुंबईत घडेल’, असे या धमकीच्या संदेशात म्हटले आहे. या संदेशात उदयपूरची घटना, सिद्धु मुसेवालाची हत्यासारख्या घटनाही होतील. तसेच अमेरिकेवरील हल्ला आठवणीत असेल, असे धमकावले आहे. एक ओसामा, एक अजमल कसाब आणि एक अल जवाहिरी मेला तर आणखी अल जवाहिरी तयार आहेत, असे ही या संदेशात इशारा देण्यात आला आहे.

हा संदेश मिळाल्यावर ट्रॅफिक पोलिसांकडून याची माहिती स्थानिक पोलीस स्टेशनला देण्यात आली. त्यानंतर हा तपास मुंबई गुन्हा अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आला. सायबर पोलीसही या संदेशाचा माग काढत आहेत. तसेच पोलीस या धमकी देणाऱ्यांनी आपल्या संदेशामध्ये दिलेली नावे व फोन नंबरची सत्यता पडताळण्याचे कामही सुरू आहे. वरळी पोलीस स्थानकात यासंदर्भात ‘एफआयआर’ दाखल करण्यात आला आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त फणसळकर यांनी मुंबईचे पोलीस ॲलर्टवर असून मुंबईच्या दहशतवादविरोधी पथकाकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला जाणार असल्याची माहिती दिली. इतर तपास यंत्रणांची मदत घेतली जात आहे. प्राथमिक तपासात संदेश आलेला नंबर पाकिस्तानी असल्याचे स्पष्ट होत आहे. आम्ही सुरक्षेच्याबाबतीत कोणतीही गोष्ट गांभीर्याने घेतो. सध्या सणासुदीचा काळ असल्याने आधीच बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. मुंबईकरांना घाबरून जाण्याची आवश्यकता नसून सुरक्षा आणि संरक्षण आमची जबाबदारी आहे, असे फणसळकर म्हणाले. या धमकीच्या संदेशाबाबत तपास हाती घेण्यात आलेला आहे. तसेच सागरी सुरक्षेलाही ॲलर्ट देण्यात आला असून ‘सागर कवच’ हे ऑपरेशन हाती घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

‘सागर कवच’ या ऑपरेशन अंतर्गत किनारपट्टीवर पोलिंग वाढविण्यात आले आहे. यासाठी नौदल आणि तटरक्षकदलाची मदत घेतली जात आहे. दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील श्रीहरिहरेश्वरच्या किनारपट्टीवर शस्त्रास्त्रासह एक संशयित बोट आढळली होती. या बोटीचा दहशतवाद्यांशी संबंध नसल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाल्याचे राज्य सरकारने म्हटले आहे. मात्र कोणतीही शक्यता नाकारलेली नाही. त्यामुळे नवी मुंबई दहशतवादविरोधी पथकाकडे हा तपास सोपविण्यात आला आहे. १९९३ च्या बॉम्बस्फोट मालिकेसाठी आलेली स्फोटके व शस्त्र सागरी मार्गानेच आली होती. तसेच २६/११चा हल्ला घडविणारे पाकिस्तानी दहशतवादी सागरी मार्गानेच मुंबईत दाखल झाले होते. या पार्श्वभूमीवर रायगडमधील संशयास्पद बोट व मुंबईवरील हल्ल्याच्या धमकीनंतर हाती घेण्यात आलेल्या ‘सागर कवच’ ऑपरेशनचे महत्त्व वाढते.

मुंबई दहशतवाद्यांच्या निशाण्यावर कायमची राहिली आहे. देशाच्या आर्थिक राजधानीला लक्ष्य करून भारताला झटका देण्याचे कारस्थान पाकिस्तानकडून वारंवार करण्यात आले आहे. मात्र गेल्या आठ वर्षात मुंबईत कोणताही हल्ला झालेला नाही. देशातही हल्ल्याचे प्रयत्न उधळण्यात आले आहेत. गेल्या काही महिन्यात दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मध्य प्रदेश, तमिळनाडू, केरळमध्ये दहशतवाद्यांचे काही मॉड्यूल उद्ध्वस्त करण्यात आली असून हल्ल्याचे प्रयत्न उधळून लावण्यात आले आहेत. मात्र पाकिस्तानी दहशतवादी संघटना सातत्याने अशी कटकारस्थाने करीत आहेत. त्यामुळे नव्या धमकीनंतर सुरक्षा यंत्रणा आहेत.

leave a reply