शिर्डीमधून दहशतवाद्याला अटक

-महाराष्ट्र व पंजाब एटीएसची कारवाई

मुंबई – महाराष्ट्र पोलिसांचे दहशतवादविरोधी पथक आणि पंजाब पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत शुक्रवारी शिर्डीतून एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली होती. पंजाब पोलिसांवर हल्ल्याचा कट या दहशतवाद्यांनी आखला होता, अशी माहिती मिळत आहे. मात्र शिर्डीपर्यंत पळून येण्यासाठी या दहशतवाद्याला कोणी मदत केली, येथे या दहशतवाद्याला कोणी आश्रय दिला होता का? याचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही.

Terrorist arrested from Shirdiकाही दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांच्या वाहनाच्या खाली एक आयईडी लपविण्यात आला होता. अमृतसर येथील रणजित एव्हेन्यू भागात उभ्या असलेल्या पोलीस उपनिरीक्षक दिलबाग सिंग यांच्या सेवेसाठी दिलेल्या वाहनाच्या खाली हा आयईडी बसविण्यात आला. हे वाहन पोलीस अधिकारी व जवानांसह उडवून देण्याची दहशतवाद्यांची योजना होती. मात्र वेळीच वाहनाखाली आयईडी लपविण्यात आल्याचे उघड झाल्याने मोठा घातपात टळला होता. यानंतर पंजाब पोलिसांनी याचा तपास हाती घेतला होता. सीसीटीव्ही फुटेज व इतर माहितीच्या आधारे या दहशतवाद्यांपर्यंत पोहोचण्यासाठी टीमही बनविण्यात आल्या.

या प्रकरणात दोनच दिवसांपूर्वी पंजाब पोलिसांच्या एका टीमने दिल्लीतून दोघा जणांना अटक केली होती. तर शुक्रवारी महाराष्ट्र पोलिसांच्या मदतीने अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डीमधून एकाला अटक करण्यात आली. या दहशतवाद्यांचा संबंध कोणत्या संघटनेशी आहे, याबाबतचा खुलासा पोलिसांनी केलेला नाही. मात्र महाराष्ट्रात दहशतवादी हल्ल्याच्या इशारा देण्यात आलेला असताना शिर्डीतून दहशतवाद्याला झालेल्या अटकेने खळबळ माजली आहे.

leave a reply