देशात पुढच्या दहा दिवसात २६०० श्रमिक स्पेशल ट्रेन्स धावणार

नवी दिल्ली – १ मे पासून आतापर्यंत देशात दोन हजारहून अधिक ‘श्रमिक स्पेशल ट्रेन्स’ धावल्या असून जवळपास ४५ लाख मजुरांना त्यांच्या राज्यात पोहचविण्यात आले आहे. रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष विनोद कुमार यादव यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. तसेच पुढच्या दहा दिवसात देशात २,६०० श्रमिक ट्रेन्स धावणार असून त्याचा ३६ लाख मजुरांना फायदा होईल, असेही यादव यांनी पुढे सांगितले. रेल्वेने कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी आवश्यक असणारे लाखो ‘ पर्सनल प्रोटेक्टिव इक्विपमेंट'(पीपीई) किट्स तयार केले आहेत, अशी माहिती यादव यांनी यावेळी दिली. तर रेल्वेने पाच हजार कोचेस कोरोनाव्हायरसच्या रुणांवरील उपचारासाठी तयार ठेवले आहेत, असे यादव यांनी पुढे सांगितले.

देशात लॉकडाऊन दरम्यान लाखो मजूर ठिकठिकाणी अडकून पडले होते. त्यांना सुखरुप त्यांच्या घरी पोहोचविण्यासाठी १ मे पासून श्रमिक स्पेशल ट्रेन्स सुरू झाल्या. प्रवाशांची स्क्रीनिंग आणि सोशल डिस्टनसिंगचे नियम पाळून मजुरांचा प्रवास सुरू झाला. १ मे रोजी चार श्रमिक स्पेशल ट्रेन्स धावल्या असून जवळपास चार हजार मजुरांनी प्रवास केला. तर गेल्या चार दिवसात देशभरात २६० श्रमिक ट्रेन्स धावल्या असून साडेतीन लाखांहून अधिक जणांनी प्रवास केल्याची माहिती यादव यांनी यावेळी दिली. यातील ८० टक्के प्रवासी उत्तर प्रदेश आणि बिहारचे होते. तर पुढच्या दहा दिवसात २६०० ट्रेन्स धावतील, असे यादव यांनी सांगितले. तसेच ही सेवा मजुरांना घरी पोहोचवेपर्यंत सुरु असेल, असे आश्वासन यादव यांनी यावेळी दिले.

१ जून पासून २०० ट्रेन्स सुरु होणार असून ऑनलाइन आणि ऑफलाईन तिकीट बुकिंग सुरु झाली आहे, असे यादव पुढे म्हणाले. कोरोनाव्हायरसची साथ आलेली असताना रेल्वेने मोठ्या प्रमाणावर अन्नधान्य, कोळसा, औषधे यांचा अव्याहतपणे पुरवठा केला आहे. तर रेल्वेने पाच हजार कोचेसचे कोव्हिड हॉस्पिटलमध्ये रुपांतर केले आहे. यातील ५० टक्के कोचेस् श्रमिक स्पेशल ट्रेन्ससाठी वापरल्याचे यादव यांनी सांगितले. तर रेल्वेने त्यांची १७ हॉस्पिटल्स कोव्हिड केअरसाठी दिली आहेत. तसेच ३३ हॉस्पिटल्सचे कोव्हिड केअर ब्लॉकमध्ये रुपांतर झाल्याचे यादव म्हणाले.

याशिवाय डॉक्टर्स, नर्सेस व इतर वैद्यकीय कर्मचाऱ्यांना पीपीई किट्सची टंचाई भासत असताना रेल्वेने आता पर्यंत एक लाख २० हजार पीपीई किट्स तयार केले आहेत. तर १.४ लाख लीटर सॅनिटायझर आणि मोठ्या प्रमाणावर मास्क तयार केले आहेत. याचा वापर रेल्वे कर्मचारी करीत असल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

leave a reply