रशिया व युक्रेनमध्ये २७० युद्धकैद्यांची देवाणघेवाण

Russia and Ukraineमॉस्को/किव्ह – रशिया-युक्रेन युद्ध अधिकाधिक तीव्र होत असतानाच दोन देशांमध्ये युद्धकैद्यांची देवाणघेवाण झाल्याचे समोर आले. रशियाने युक्रेनचे २०० हून अधिक युद्धकैदी मुक्त केले आहेत. तर युक्रेनने ५५ रशियन जवान तसेच रशियासमर्थक युक्रेनी नागरिकांना सोडल्याचे सांगण्यात येते. रशिया-युक्रेनमधील या प्रक्रियेसाठी तुर्की तसेच सौदी अरेबियाचे ‘क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान’ यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडल्याचे सांगण्यात येते.

सौदी अरेबियाच्या परराष्ट्र विभागाकडून रशिया-युक्रेन युद्धकैद्यांच्या देवाणघेवाणीसंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे. त्यात क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांनी रशिया-युक्रेन संघर्षादरम्यान घेतलेल्या मानवतावादी भूमिकेचा उल्लेख करून त्यांनी युद्धकैद्यांच्या प्रक्रियेत मध्यस्थी केल्याचे सांगण्यात आले. रशियाने मुक्त केलेल्या युद्धकैद्यांमध्ये मारिपोलमध्ये युक्रेनसाठी संघर्ष केलेल्या ‘अझॉव्ह बटालियन’चे अधिकारी व जवानांचा समावेश आहे. त्याचवेळी अमेरिका व ब्रिटनसह युरोपिय देशांमधून युक्रेनसाठी लढण्यास गेलेल्या परदेशी जवानही सामील असल्याचे सांगण्यात येते.

युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांनी युद्धकैद्यांची सुटका हा देशाचा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली. तर तुर्कीने ही प्रक्रिया युद्ध संपविण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ठरु शकते, असे म्हंटले आहे.

leave a reply