‘टेरर लिंक’प्रकरणात ‘एनआयए’ची आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई

११ राज्यात ‘पीएफआय’च्या ठिकाणांवर धाडी, १०६ जणांना अटक

नवी दिल्ली – देशविरोधी कारवाया, सामाजिक सलोखा बिघडून देशात दंगली भडकाविण्याचा प्रयत्न, दहशतवादाचा प्रसार, मनी लॉण्डरिंगचा आरोप असणाऱ्या ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’च्या ठिकाणांवर गुरुवारी ‘एनआयए’ने धाडी टाकल्या. ११ राज्यात ही कारवाई करण्यात आली असून १०६ जणांना अटक करण्यात आली आहे. छापे आणि कारवाई दरम्यान झालेली अटक पाहता ही आतापर्यंत एनआयएने केलेली सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच या कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एक उच्चस्तरिय बैठक घेतल्याचे वृत्त आहे.

NIA's biggest ever action‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया’ (पीएफआय) या संघटनेचे नाव गेल्या चार ते पाच वर्षात अनेक प्रकरणात समोर आले आहे. काही राज्यांमधील दंगलींमध्ये, तसेच सरकारविरोधातील हिंसक निदर्शनांमध्येही पीएफआय व या संघटनेच्या सदस्यांची नावे आली आहे. महिनाभरापूर्वी बिहारमधून दहशतवादी हल्ल्याच्या कट रचल्याप्रकरणी दोघा जणांना अटक करण्यात आली होती. तर दोन महिन्यांपूर्वी तेलंगणा पोलिसांनी कराटे सेंटरच्या आडून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देणाऱ्या पीएफआयच्या नेटवर्कचा भांडफोड केला होता. देशभरातून २०० जणांना येथे दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती समोर आली होती.

या दोन्ही प्रकरणात ‘राष्ट्रीय तपास संस्था’ (एनआयए) तपास करीत आहे. तसेच इतर काही मनी प्रकरणात लॉण्डरिंगच्या आरोपावर अंमलबजावणी संचलनालयाने (ईडी) तपास हाती घेतला आहे. पीएफआयच्या गेल्या काळातील हालचालींप्रकरणात विविध तपास संस्था चौकशी करीत असून गुरुवारी टाकण्यात आलेले छापे ‘पीएफआय’विरोधात सुरू झालेल्या या विस्तृत तपासाचा भाग होता. गुरुवारी ‘एनआयए’च्या नेतृत्त्वाखाली विविध तपास यंत्रणांनी ही संयुक्त कारवाई केली आहे.

११ राज्यात एकाचवेळी विविध ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. यासाठी मोठा सुरक्षा बंदोबस्तही ठेवण्यात आला होता. पीएफआयच्या काही प्रमुख नेत्यांनी व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना यावेळी अटक करण्यात आली. एकूण किती ठिकाणी छापे टाकण्यात आले याची माहिती समोर आलेली नाही. मात्र १०६ जणांना अटक करण्यात आल्याचे ‘एनआयए’ने दिलेल्या माहितीमध्ये म्हटले आहे.

केरळमधून सर्वाधिक २२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. तसेच यानंतर महाराष्ट्र २० आणि कर्नाटकातून २० जणांना अटक करण्यात आली आहे. महाराष्ट्रातील १२ जिल्ह्यात धाडी टाकण्यात आल्या. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, बीड, परभणी, नांदेड, जळगांव, जालना, मालेगांव या जिल्ह्यांमध्ये ही छापेमारी झाली व मोठ्या प्रमाणावर कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. मुंबई, औरंगाबाद, नांदेड, नाशिकमध्ये चार गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राच्या दहशतवादविरोधी पथकाने दिली आहे.

केरळ, कर्नाटक व महाराष्ट्रानंतर तमिळनाडूतून १० जणांना, आसाममधून नऊ, उत्तर प्रदेशातून आठ, आंध्र प्रदेशातून पाच, मध्य प्रदेशमधून चार, पुद्दूचेरी आणि दिल्लीमधून प्रत्येकी तीन आणि राजस्थानातून दोन जणांना अटक करण्यात आली आहे. पीएफआय ही संघटना २००६ साली स्थापन झाली होती. भारतातील संख्येने कमी असलेल्या समाजाचे सक्षमीकरण करणारी सामाजिक चळवळ म्हणून पीएफआय स्थापना करण्यात आल्याचा दावा संघटनेच्या वतीने केला जातो. मात्र प्रत्यक्षात ही संघटना म्हणजे दहशतवादी कारवायांसाठी याआधी सरकारने बंदी घातलेल्या स्टूडन्टस्‌‍ इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनाचेच बदललेले रुप असल्याचे आरोप होतात. १९९४ साली नॅशनल डेमोक्रेटिंग फ्रन्ट (एनडीएफ) ही संघटना स्थापन झाली होती. ही संघटना पुढे २००६ साली पीएफआयमध्ये विलीन करण्यात आली. या एनडीएफची स्थापना करणारे संस्थापक सदस्य हे सिमीशीच संबंधीत होते, याकडे लक्ष वेधण्यात येते. गेल्या काही वर्षात दंगलीसह काही हत्या व हिंसक घटनांमध्येही पीएफआयचे नाव आले आहे. या संघटनेवर बंदीची मागणी याआधी देशातील काही राज्यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर झालेल्या या कारवाईचे महत्त्व वाढते.

leave a reply