मोरोक्कोमधून स्पेनमध्ये घुसखोरी करणाऱ्या 29 निर्वासितांचा बळी

refugees-Moroccoमाद्रिद/रबात – आफ्रिकेतून स्पेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या 29 आफ्रिकी निर्वासितांचा मृत्यू झाला आहे. उत्तर आफ्रिकेतील ‘स्पॅनिश टेरिटरी’ म्हणून ओळखण्यात येणाऱ्या मिलिला भागात ही घटना घडली. या भागात उभारलेले उंच कुंपण तोडून तसेच त्यावरून चढून जाण्याच्या प्रयत्नात निर्वासितांचा बळी गेल्याचे स्थानिक स्वयंसेवी संघटनांनी सांगितले. गेल्या वर्षी जमीन तसेच सागरी मार्गाने स्पेनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्या चार हजारांहून अधिक निर्वासितांना प्राण गमवावे लागले होते.

गेली दोन वर्षे कोरोनामुळे असलेल्या विविध निर्बंधांमुळे युरोपिय देशांमध्ये बेकायदा घुसखोरी करणाऱ्या निर्वासितांची संख्या काही प्रमाणात घटली होती. मात्र कोरोनाची तीव्रता कमी झाल्यानंतर तसेच निर्बंध शिथिल झाल्यानंतर पुन्हा एकदा आफ्रिका व इतर भागांमधून येणाऱ्या निर्वासितांची संख्या वाढण्यास सुरुवात झाली आहे. 2022 सालाच्या सुरुवातीपासून स्पेनमध्ये दर महिन्याला सरासरी चार हजारांहून अधिक निर्वासित येण्याचा प्रयत्न करीत असल्याची आकडेवारी नुकतीच प्रसिद्ध झाली होती.

Melilla_and_Ceuta_Spainया पार्श्वभूमीवर मोरोक्को-स्पेन सीमेवर घडलेली घटना लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. शुक्रवारपासून मोरोक्को-स्पेन सीमेवरील मिलिला भागात हजारो आफ्रिकी निर्वासित जमा होण्यास सुरुवात झाली होती. निर्वासितांनी बेकायदा घुसखोरीचे प्रयत्न करु नये म्हणून मोरोक्कन सुरक्षायंत्रणांनी कारवाई सुरू केली. मात्र त्याला न जुमानता निर्वासितांच्या काही गटांनी कुंपणावरून चढत तसेच ते तोडण्याचा प्रयत्न करीत स्पेनच्या सीमेत घुसण्याचा प्रयत्न केला.

सुरक्षायंत्रणांची कारवाई व स्पेनच्या सीमेत घुसण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांमध्ये झालेली चेंगराचेंगरी यात 29 जणांचा बळी गेला. चेंगराचेंगरीत अनेक जण जखमीही झाले असून मृतांची संख्या वाढण्याची भीती स्वयंसेवी संघटनांनी व्यक्त केली आहे. मृत निर्वासितांचे फोटोग्राफ्स स्वयंसेवी गटांकडून प्रसिद्ध करण्यात आले आहेत. त्यात मृतदेह एकावर एक पडल्याचे दाखविण्यात आले आहे. मोरोक्को तसेच स्पेनच्या यंत्रणांनी निर्वासितांना अमानवी वागणूक दिल्याचा दावा स्वयंसेवी गटांनी केला.

मात्र स्पेनने निर्वासितांची बेकायदा घुसखोरी म्हणजे आपल्या क्षेत्रिय अखंडतेवर हल्ला असल्याची टीका केली आहे. मानवी तस्करी करणाऱ्या टोळ्यांमुळे ही वेळ ओढावल्याचा आरोपही स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सान्चेझ यांनी केला. स्पेनच्या सुरक्षायंत्रणांनी मोरोक्कन यंत्रणांनी परिस्थिती चुकीच्या पद्धतीने हाताळल्याचा दावा केला. मोरोक्को-स्पेन सीमेवर घडलेल्या या घटनेने युरोपातील निर्वासितांच्या घुसखोरीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याचे संकेत मिळाले आहेत.

leave a reply