अफगाणिस्तानमधील आत्मघाती हल्ल्यात तीन ठार

काबुल – अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील लष्करी तळावर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. अफगाणिस्तानचे संरक्षणमंत्री जनरल असादुल्लाह खलिया आणि अफगाणिस्तानातील अमेरिकेचे जनरल स्कॉट मिलर यांनी या हल्ल्याच्या एक दिवस आधी या तळाला भेट दिली होती. त्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य अनेक पटींनी वाढले आहे. हा हल्ला तालिबानने घडविला असावा असा दाट संशय व्यक्त केला जातो. हा हल्ला आपल्या सदस्यांनी चढविला का याची तालिबानकडून चौकशी केली जाईल, अशी चमत्कारिक प्रतिक्रिया तालिबानने दिली आहे.

बुधवारी काबुलमधील चार असीब जिल्ह्यातील हा लष्करी तळ तालिबानी दहशतवाद्यांच्या निशाण्यावर होता. इथे भयंकर जीवितहानी घडवून आणण्याचा दहशतवाद्यांचा कट होता. मात्र यात त्यांना फार मोठे यश मिळू शकले नाही. या हल्ल्यात तीन जण ठार झाले आहेत. याच्या एक दिवस आधीच अफगाणिस्तानचे संरक्षण मंत्री व अफगाणिस्तानातील अमेरिकी लष्कराचे कमांडर जनरल स्कॉट मिलर यांनी या तळाला भेट दिली होती. त्यामुळे या हल्ल्याचे गांभीर्य वाढले असून हा हल्ला घडवून तालिबानने शक्तिप्रदर्शन केल्याची चर्चा अफगाणिस्तानमध्ये सुरू आहे.

तालिबानने थेट या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. हा हल्ला आपल्या सदस्यांनी चढविला की इतर कोणी याची तालिबान चौकशी करेल असे या संघटनेचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहिद याने म्हटले आहे. मात्र हा हल्ला तालिबानने घडविला यावर अफगाणिस्तानची सुरक्षा यंत्रणा ठाम असल्याचे दिसत आहे. गेल्या काही आठवड्यांपासून अफगाणिस्तानच्या सुमारे चौदा प्रांतांमध्ये अफगाणी सुरक्षा दलांच्या जवानांवर तालिबानकडून भीषण हल्ल्याचे सत्र सुरू झाले आहे. यात सुरक्षा दलाचे दीडशे जवान ठार झाले आहेत. तसेच तालिबानच्या काही दहशतवाद्यांचा यात खात्मा झाल्याचे सांगितले जाते. यामुळे अमेरिका व तालिबानमध्ये झालेल्या शांती करार जवळपास संपुष्टात आला असून पुढच्या काळात अफगाणिस्तानातील संघर्ष अधिक रक्तरंजित असेल, अशी चिंता व्यक्त केली जात आहे. तालिबानने अफगाणिस्तानची सत्ता हातात घेण्याची तयारी केली असून येत्या काही महिन्यातच तालिबान अफगाणिस्तानच्या सत्तेवर येऊ शकेल ,असे दावे पाश्चिमात्य वर्तमानपत्रे करू लागली आहेत.

अमेरिकेने अफगाणिस्तानसाठी नियुक्त केलेले विशेषदूत खल्मे झलिझदाद यांनी तालिबानला अफगाणिस्तानातील हल्ले थांबविण्याचे आवाहन केले होते. पण त्याचा विशेष प्रभाव या संघटनेवर पडलेला नाही. अशा परिस्थितीत तालिबानच्या या हल्ल्यावर अमेरिका कोणती भूमिका घेते याकडे विश्लेषकांचे लक्ष लागलेले आहे. जर तालिबानने अमेरिकेबरोबर केलेला शांतीकरार मोडीत काढला तर मात्र अमेरिका तालिबानवर भयंकर हल्ले चढवेल, असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शांती कराराच्या दरम्यान दिला होता.

leave a reply