भारतीय लष्कराच्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानचे तीन जवान ठार

श्रीनगर – काश्मीरच्या पुंछ येथील नियंत्रणरेषेवर भारतीय लष्कराने चढविलेल्या प्रतिहल्ल्यात पाकिस्तानी लष्कराच्या चार चौक्या नष्ट झाल्या असून पाकिस्तानचे तीन ते चार जवान ठार झाले आहेत. पाकिस्तानच्या लष्करानेही भारताकडून घणाघाती हल्ले चढविले जात असल्याचे मान्य केले. मात्र यात आपले जवान नाही तर सहा नागरिक जखमी झाल्याचे पाकिस्तानने म्हटले आहे. तसेच पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने या प्रकरणी भारताच्या राजनैतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहेत.

शुक्रवारी जम्मू आणि काश्मीरच्या पुंछच्या नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी लष्कराकडून गोळीबार आणि मॉर्टर्सचा मारा सुरु झाला. याला भारतीय लष्कराने दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे तीन ते चार जवान ठार झाले. तर पाच जण जखमी असल्याचे सांगितले जाते. तसेच या हल्ल्यात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चार चौक्या उडवून दिल्या. काश्मीरच्या नियंत्रणरेषेवर भारतीय लष्कर मॉर्टर्स आणि तोफांचा मारा करुन सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांना लक्ष्य करीत असल्याचा कांगावा पाकिस्तानच्या डीजी आयएसपीआरने केला आहे. या प्रकरणी पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्रालयाने भारतीय राजनैतिक अधिकाऱ्यांना समन्स बजावले आहे.

गेल्या काही दिवसांपासून काश्मीरच्या नियंत्रणरेषेवरचा तणाव प्रचंड प्रमाणात वाढला आहे. या वर्षाच्या जानेवारी महिन्यापासून पाकिस्तानने तब्बल १५०० वेळा संघर्षबंदीचे उल्लंघन करुन भारतीय चौक्यांवर गोळीबार केला होता. वैफल्यग्रस्त पाकिस्तानचे लष्कर या गोळीबाराचा फायदा घेऊन भारतात दहशतवादी धाडण्याचा प्रयत्न करीत आहेत. पण भारतीय लष्कराने पाकिस्तानचे हे कटकारस्थान उधळून लावले आहे.

leave a reply