कोरोनासोबत जगणे शिकायला हवे

- आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल

नवी दिल्ली – देशात कोरोनामुळे दगावलेल्यांची संख्या दोन हजारांच्या जवळ, तर रुग्णांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. यापार्श्वभूमीवर कोरोनाच्या वाढत्या संक्रमणाचे प्रमाण पाहता जून महिन्यात देशात कोरोनाचे संक्रमण सर्वोच्च पातळीवर पोहोचलेले असेल, असे गुरुवारी ‘एम्स’चे संचालक रणदीप गुलेरिया म्हणाले होते. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी यावर बोलताना सर्वांनी सूचनांचे पालन काटेकोरपणे केले आणि दक्षता बाळगली तर ही वेळ येणार नाही, असे स्पष्ट केले. त्याचवेळी ही साथ झटकन संपून जाईल असेही होणार नाही. त्यामुळे आपल्या वर्तनात बदल करत दिलेल्या सूचना अमलात आणून या विषाणूबरोबर जगायला शिकायला हवे, असा संदेश अग्रवाल यांनी दिला.

देशातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या गुरुवार सकाळपासून ते शुक्रवार सकाळपर्यंत ३,३९० ने वाढून ५६,३४२ पर्यंत पोहोचली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. मात्र यामध्ये शुक्रवारी दिवसभरात नोंद झालेल्या रुग्णांचा समावेश नसल्याने प्रत्यक्षात देशातील रुग्णांची संख्या ५९ हजारांच्या पुढे गेल्याचे समोर येते. महाराष्ट्रात सलग तिसऱ्या दिवशी हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळले. शुक्रवारी राज्यात ३७ जणांचा या साथीत बळी गेला, तर १,०८९ नव्या रुग्णांची नोंद झाली. राज्यातील कोरोनाव्हायरसच्या रुग्णांच्या संख्येने १९ हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गुजरातमध्ये २४ जणांचा बळी गेला असून ३९० नव्या रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली,मध्यप्रदेशच्या शहरी भागात रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे.

या पार्श्वभूमीवर, देशात कोरोनाचे रुग्ण दुप्पट होण्याचा वेग १२ दिवसावरून १० दिवसांपर्यंत खाली आला असल्याची माहिती, अग्रवाल यांनी दिली. काही ठिकाणी रुग्ण संख्येत वाढ झाल्याने रुग्ण दुप्पटीचा वेळ घटला असल्याचे अग्रवाल म्हणाले. तसेच जून महिन्यात देशातील कोरोनाचे संक्रमणाने शिखर गाठलेले असेल, या व्यक्त केल्या जाणाऱ्या भीतीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. ‘प्रत्येकाने सावधगिरी बाळगली, सर्व सूचनेचे पालन केले, तर तशी वेळ येणार नाही. रुग्ण वाढीचा आलेख सपाटच राहील. मात्र यामध्ये आपण चुकलो तर तशी स्थिती ओढविण्याची शक्यता आहे”, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. तसेच रुग्ण व संक्रमण झटपट घटत जाईल असेही होणार नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. ”त्यामुळे आता आपण या विषाणू बरोबर जगणे शिकायला हवे. मात्र विषाणूबरोबर जगणे शिकावे लागेल असे बोलले जाते त्यावेळी या विषाणूपासून स्वतःचा बचाव करण्यासाठी दिलेल्या सूचना पालन करणे, त्या आपल्या वर्तनाचा भाग करणे गरजेचे आहे”, असा संदेश अग्रवाल यांनी दिला. यासाठी सर्वांच्याच सहकार्याची आवश्यकता असल्याचे अग्रवाल म्हणाले.

दरम्यान, शुक्रवारी मुंबईत या साथीमुळे आणखी २५ जणांचा बळी गेला आणि ७४८ नवे रुग्ण आढळले. यामुळे मुंबईत या साथीने दगावलेल्यांची संख्या ४६२ झाली असून एकूण रुग्णांची संख्या १२ हजारांजवळ पोहोचली आहे. मुंबई आणि ठाण्यात वाढत्या संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील ‘एपीएमसी’ मार्केट आठवडाभर संपूर्णपणे बंद राहणार आहे. मुंबईत या साथीच्या वाढते संक्रमण आणि लॉकडाउनच्या अंमलबजावणीसाठी पोलिसांवरील ताण वाढला आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून अतिरिक्त कुमक पाठविण्याची मागणी राज्य सरकारने केल्याचे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच मुंबईत लष्कराला पाचारण करण्यात येणार नसल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याशिवाय लॉकडाऊन वाढवायचा की नाही हा निर्णय नागरिक सूचनांचे कशापद्धतीने पालन करतात, यावर अवलंबून आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

leave a reply