अफगाणिस्तानातील संघर्षात ३५ जण ठार

- संघर्षावर तोडगा शोधण्याचे अमेरिकेचे आश्‍वासन

काबुल/वॉशिंग्टन – गेल्या चोवीस तासात अफगाणिस्तानच्या वेगवेगळ्या भागात अफगाणी लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये पेटलेल्या संघर्षात ३५ जण ठार झाले आहेत. यामध्ये नऊ जवानांचा समावेश आहे. याशिवाय अफगाणी लष्कराने तालिबान आणि आयएससाठी काम करणार्‍या दहशतवादी कमांडरलाही अटक केली आहे. दरम्यान, आत्तापर्यंत अफगाणी जनता आणि सुरक्षा यंत्रणेला लक्ष्य करणार्‍या तालिबानने दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवाईतळावर रॉकेट हल्ला चढवून इशारा दिल्याचे दिसत आहे. तर अफगाणिस्तानातील संघर्ष जबाबदारीने संपविण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचे आश्‍वासन अमेरिकेने दिले आहे.

शुक्रवारी रात्री उशीरा अफगाणिस्तानच्या हवाईदलाने उत्तरेकडील बडाखशान प्रांतातील वारदोज भागात हल्ले चडविले. या ठिकाणी तालिबानचा स्थानिक नेता कारी हैदर दडल्याची माहिती सुरक्षा यंत्रणांना मिळाली होती. अफगाणी लष्कराच्या या कारवाईत तालिबान कमांडर कारी हैदर याच्यासह २६ दहशतवादी ठार झाले. याशिवाय मोठा शस्त्रसाठा जप्त करून तालिबानचे कमांड सेंटर आणि सहा चौक्या उद्ध्वस्त करण्यात यश मिळाल्याची माहिती अफगाणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली.

या कारवाईच्या काही तास आधी तालिबानच्या दहशतवाद्यांनी इराणच्या सीमेजवळील हेरात प्रांतात अफगाणी सुरक्षा यंत्रणांवर हल्ले चढविले होते. येथील कोशान आणि घोरियन जिल्ह्यातील हल्ल्यांमध्ये अफगाणी सुरक्षा यंत्रणेचे तळ उद्ध्वस्त केले. यामध्ये १३ जवान मारले गेले तर २२ जणांचे अपहरण केल्याचा दावा तालिबान करीत आहे. पण अफगाणी सुरक्षा यंत्रणांनी नऊ जवानांचा बळी गेल्याचे म्हटले आहे. अफगाणिस्तानच्या नांगरहार प्रांतातही तालिबानने अफगाणी लष्करावर हल्ले चढविल्याच्या बातम्या येत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून अफगाणी सुरक्षा यंत्रणा आणि तालिबानमधील संघर्ष तीव्र झाला आहे. त्याचबरोबर तालिबानकडून अफगाणी जनतेलाही लक्ष्य केले जात आहे. अमेरिकेबरोबर झालेल्या संघर्षबंदीनंतर तालिबानच्या या हल्ल्यांमध्ये वाढ झाल्याचा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे करीत आहेत. गेल्या वर्षभरात तालिबानने ९२ आत्मघाती हल्ले तर आयईडी स्फोटकांचा वापर करून २,१७४ हल्ले चढविले आहेत. याशिवाय ४९७ वेळा खून पाडले आहेत. या हल्ल्यांमध्ये १,९९३ जणांचा बळी गेला असून यामध्ये किमान ९० धार्मिक नेत्यांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. तालिबानच्या हल्ल्यांमध्ये ४,१७४ जण जखमी झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या सरकारने दिली.

तालिबानचे हे हल्ले आता अफगाणी जनता आणि सुरक्षा यंत्रणांपर्यंत मर्यादित राहिलेले नाहीत. तर तालिबानने येथे तैनात अमेरिकी लष्करालाही लक्ष्य करण्यास सुरुवात केल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी अफगाणिस्तानच्या कंदाहर प्रांतातील अमेरिकेच्या हवाईतळावर रॉकेट हल्ले झाले. अमेरिकेचे संरक्षण मुख्यालय पेंटॅगॉनचे प्रवक्ते जॉन किरबाय यांनी हवाईतळांवरील या हल्ल्यांची कठोर शब्दात निर्भत्सना केली. पण हे हल्ले चढवून तालिबानने वर्षभरापूर्वीच्या संघर्षबंदीच उल्लंघन केली आहे का? या प्रश्‍नाचे उत्तर देण्याचे किरबाय यांनी टाळले.

गेल्या वर्षी कतारची राजधानी दोहा येथे अमेरिका आणि तालिबानमध्ये संघर्षबंदी करार झाला होता. मार्च महिन्यात हा करार संपुष्टात आला असून तालिबानने अमेरिकेला अफगाणिस्तानातून सैन्य माघार घेण्यासाठी १ मे पर्यंतची मुदत दिली होती. त्याच्या आधी अमेरिकेने सैन्य माघारी घेतले नाही तर अमेरिका व नाटोच्या लष्करावर भीषण हल्ले चढविण्याची धमकी तालिबानने दिली होती. दोन दिवसांपूर्वी अमेरिकेच्या हवाईतळावर हल्ला चढवून तालिबानने याची आठवण करून दिल्याचे दिसते.

leave a reply