येमेनमध्ये हस्तक्षेप केल्यास तुर्कीची गत सौदीसारखीच होईल

- हौथी बंडखोरांचा इशारा

सना – ‘येमेनमधील गृहयुद्धामध्ये तुर्कीने हस्तक्षेप करून आपले जवान उतरवले तर सौदी अरेबियाप्रमाणे तुर्कीलाही गंभीर परिणामांना सामोरे जावे लागेल. तुर्कीचीही गय केली जाणार नाही’, असा इशारा हौथी बंडखोरांनी दिला. तुर्की आणि सौदीमधील संबंध सुधारत आहे. तुर्कीची येमेनमधील लष्करी गुंतवणूक देखील याच सहकार्याचा एक भाग असल्याचा दावा लेबेनीज वर्तमानपत्राने आठवड्यापूर्वी केला होता. यावर हौथी बंडखोरांनी तुर्कीला हा इशारा दिला.

येमेनमधील ‘सुप्रीम पॉलिटिकल काऊन्सिल इन येमेन’ या हौथी संलग्न राजकीय गटाचे वरिष्ठ सदस्य अब्दुल वाहिद अल-महबाशी यांनी इराणी वृत्तसंस्थेशी बोलताना तुर्कीला धमकावले. ‘गेल्या पाच वर्षांहून अधिक काळ येमेनमध्ये संघर्ष पुकारणारे अमेरिका, पर्शियन आखातातील अरब देश, त्यांचे कंत्राटी सैनिक आणि या देशांच्या माध्यमांना अपयशाला सामोरे जावे लागले आहे. इंधनाच्या व्यवहारांवर अर्थव्यवस्था उभी असूनही हे देश येमेनमध्ये अपयशी ठरले असून त्यांना स्वत:च तयार केलेल्या दलदलीतून माघार घ्यावी लागत आहे’, असे महबाशी यांनी म्हटले आहे.

‘तुर्कीचे राष्ट्राध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगन येमेनमधील संघर्षासाठी आपल्या जवानांचा बळी देणार नाहीत. लिबिया आणि अझरबैजान-आर्मेनियातील नागोर्नो-कराबाखच्या संघर्षाप्रमाणे तुर्की येमेनमध्येही कंत्राटी जवानांचा वापर करील. कारण येमेनमध्ये आपल्या जवानांना घुसविणे एर्दोगन आणि त्यांच्या सरकारसाठी चांगले ठरणार नाही’, असा इशारा महबाशी यांनी दिला. ‘तरीही तुर्कीने येमेनमधील संघर्षात सहभाग घेतला तर या देशाच्या नेतृत्वाकडे शहाणपण आणि दूरदर्शीत्त्व नसल्याचे सिद्ध होईल. तुर्कीच्या नेत्यांना असंमजपणा आणि संकुचित दृष्टीने ग्रासलेले आहे, हे यामुळे जगजाहीर होईल’, अशी टीका हौथी बंडखोरांच्या वरिष्ठ नेत्याने केली.

येमेनच्या दक्षिणेकडील आफ्रिकेच्या सोमालियात सध्या निवडणूकीची तयारी सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर, तुर्कीने सोमालियामध्ये लष्करी वाहने आणि शस्त्रास्त्रे उतरविल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. ही लष्करी वाहने व शस्त्रसाठा येमेनच्या दक्षिणेकडील केना बंदरात दाखल झाला आहे. हौथी बंडखोरांविरोधात लढणार्‍या सौदी समर्थक इसलाह या बंडखोर गटाला सहाय्य करण्यासाठी तुर्कीने हा शस्त्रसाठा पाठविल्याची माहिती समोर आली होती. याशिवाय सिरियातील तुर्कीचे कंत्राटी सैनिक येमेनच्या मारिब शहरात हौथीविरोधी संघर्षासाठी दाखल झाल्याचा दावा लेबेनीज वर्तमानपत्राने केला होता.

दरम्यान, तुर्की, सौदी किंवा सोमालियाने हौथी बंडखोर व लेबेनीज वर्तमानपत्रातील बातमीवर प्रतिक्रिया दिलेली नाही. पण दोन दिवसांपूर्वीच, येमेनमधील सौदीसमर्थक सरकारचे परराष्ट्रमंत्री अहमद अवाद बिन मुबारक यांनी, येमेनमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी तुर्की करीत असलेल्या प्रयत्नांचे स्वागत केले होते. त्या पार्श्‍वभूमीवर हौथी बंडखोरांकडून तुर्कीला देण्यात आलेली धमकी लक्ष वेधून घेत आहे.

leave a reply