सोमालियात अल शबाबने घडविलेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये 35 जणांचा बळी

35 जणांचा बळीमोगादिशु – ‘अल कायदा’शी संलग्न असलेल्या ‘अल शबाब’ या दहशतवादी संघटनेने सोमालियात घडविलेल्या आत्मघाती स्फोटांमध्ये 35 जणांचा बळी गेला असून 70हून अधिक जण जखमी झाले आहेत. मध्य सोमालियातील हिरान प्रांतात हा हल्ला करण्यात आला. काही दिवसांपूर्वीच सोमालिया लष्कर व स्थानिक सशस्त्र गटांनी हिरान भागात अल शबाबविरोधात व्यापक दहशतवादविरोधी मोहीम हाती घेतली होती. असे असतानाही दोन आत्मघाती स्फोट घडवून अल शबाबने आपला प्रभाव दाखवून दिल्याचा दावा स्थानिक माध्यमे करीत आहेत.

हिरान प्रांतातील महास या शहरातील निवासी इमारतींनजिक दोन आत्मघाती स्फोट घडविण्यात आले. या स्फोटात नागरिकांसह काही लष्करी अधिकाऱ्यांचा तसेच जवानांचाही बळी गेल्याचे सांगण्यात येते. स्फोटांमध्ये 72 जण जखमी झाले असून अनेकांना राजधानी मोगादिशुमधील हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे. बुधवारी घडविण्यात आलेल्या या स्फोटानंतर अल शबाबने मध्य सोमालियातील हिरशॅबेल प्रांतातील एका गावावर दहशतवादी हल्ला चढविला.

35 जणांचा बळीशुक्रवारी पहाटे घडविलेल्या या हल्ल्यात किमान सहा जणांचा बळी गेला असून अनेक जण जखमी झाले आहेत. गेल्याच आठवड्यात लष्कर व स्थानिक सशस्त्र गटांनी सदर गाव अल शबाबच्या ताब्यातून मुक्त केले होते. मात्र आता पुन्हा अल शबाबने त्या भागात ताबा मिळविला असून लष्करा वाहने व शस्त्रसाठा ताब्यात घेतल्याचाही दावा केला. अल शबाबच्या या प्रतिहल्ल्यामुळे लष्करी मोहिमेला मोठा धक्का बसल्याचे सांगण्यात येते.

गेल्या दशकात सोमालिया लष्कर व आफ्रिकी महासंघाने राबविलेल्या व्यापक मोहिमेत देशातील शहरी भागांमधून अल शबाबचा प्रभाव मोडून काढण्यात आला होता. मात्र ग्रामीण क्षेत्रातील अनेक भागांमध्ये अल शबाब अजून सक्रिय असून त्याचा बिमोड करण्यासाठी केलेल्या कारवाया अपयशी ठरल्याचे सातत्याने समोर येत आहेत. गेल्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात सोमालिया सरकारने ‘अल शबाब’विरोधात ‘टोटल वॉर’ छेडत असल्याची घोषणा केली होती. मात्र या घोषणेनंतर अवघ्या दोन महिन्यात राजधानी मोगादिशुमध्ये केलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात 116 जणांचा बळी गेला होता.

सोमालियातील दहशतवादविरोधी मोहिमेसाठी आफ्रिका तसेच अमेरिका दोघांनीही सहाय्य पुरविले आहे. मात्र तरीही अल शबाब अद्यापही आपला प्रभाव टिकवून असल्याचे गेल्या तीन दिवसांमध्ये झालेल्या हल्ल्यांमधून दिसून येत आहे.

leave a reply