दक्षिण आफ्रिकेत आलेल्या महापुरात ४०० जणांचा बळी

महापुरात ४०० जणांचा बळीदरबान – दक्षिण आफ्रिकेच्या क्वाझुलू-नाताल प्रांतात झालेली अतिवृष्टी व त्यानंतर आलेल्या महापुरात ४०० जणांचा बळी गेला आहे. हा महापूर दक्षिण आफ्रिकेच्या इतिहासातील सर्वात मोठी व भयावह नैसर्गिक आपत्ती असल्याची माहिती स्थानिकांनी दिली. ४० हजारांहून अधिक जणांना महापुराचा फटका बसला असून शेकडो घरे वाहून गेली आहेत. दक्षिण आफ्रिकेने एवढ्या प्रचंड संकटाला तोंड देण्याची गेल्या अनेक दशकांमधील ही पहिलीच वेळ आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्राध्यक्ष सिरिल रामाफोसा यांनी दिली.

सोमवारी ११ एप्रिलला क्वाझुलू-नाताल प्रांतात २४ तासांच्या अवधीत तब्बल ३०० मिलिमीटर्स इतका पाऊस पडला. प्रांतातील सर्वात मोठे शहर असणार्‍या दरबान व आजूबाजूच्या भागांना त्याचा मोठा फटका बसला. एका दिवसात इतक्या प्रचंड प्रमाणात पाऊस होण्याची गेल्या सहा दशकांमधील ही पहिलीच घटना असल्याची माहिती स्थानिक यंत्रणांनी दिली. या अतिवृष्टीमुळे शेकडो घरे वाहून गेली असून महामार्ग तसेच पूल पाण्याखाली बुडाले आहेत. अनेक छोट्या टेकड्या व डोंगर भूस्खलन तसेच दरडी कोसळून नष्ट झाले आहेत.

महापुरात ४०० जणांचा बळीप्रांतातील ४० हजारांहून अधिक जणांना महापुराचा फटका बसला असून ४०० जणांचा बळी गेला आहे. ५५ जण अजूनही बेपत्ता असून बचावकार्य पूर्ण झाल्यावरच जीवितहानीचा खरा आकडा समोर येईल, अशी माहिती अधिकार्‍यांनी दिली. क्वाझुलू-नाताल प्रांतात ‘स्टेट ऑफ डिझास्टर’ची घोषणा करण्यात आली असून चार हजार जवान व स्वयंसेवक तैनात करण्यात आले आहेत. ‘ही आमच्या प्रांतावर आलेली सर्वात मोठी आपत्ती आहे. प्रांतात झालेली जीवितहानी आणि पायाभूत सुविधा व इतर सेवांचा विनाश अभूतपूर्व आहे’, अशी प्रतिक्रिया प्रांताचे प्रमुख सिह्ले झिकालाला यांनी दिली.

महापुरात ४०० जणांचा बळीदक्षिण आफ्रिकेतील तिसर्‍या क्रमांकाचे शहर म्हणून ओळखण्यात येणार्‍या दरबानला सर्वाधिक फटका बसला आहे. अतिवृष्टी व वादळी वार्‍यांमुळे बंदर भागातील अनेक व्यापारी कंटेनर वाहून गेल्याचे तसेच शहराच्या इतर भागांमध्ये पसरल्याचे समोर आले आहे. दरबान हे आफ्रिकेतील सर्वाधिक व्यस्त बंदरांपैकी एक म्हणून ओळखले जाते. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसह आफ्रिकेतील इतर देशांच्या पुरवठा साखळीला मोठा धक्का बसण्याचे संकेत देण्यात आले आहेत. पुढील काही दिवसात प्रांतात पुन्हा जोरदार पाऊस होण्याचे भाकित वर्तविण्यात आले असून अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोरोनाची साथ व गेल्या वर्षी दोन प्रांतांमध्ये झालेल्या दंगली यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेला आधीच मोठे धक्के बसले आहेत. अशा वेळी अभूतपूर्व नैसर्गिक आपत्तीमुळे जनजीवन व अर्थव्यवस्था पुन्हा एकदा विस्कळीत झाली असून दक्षिण आफ्रिकेच्या अर्थव्यवस्थेवर मंदीचे संकट येऊ शकते, अशी भीती अर्थतज्ज्ञ व विश्‍लेषकांनी व्यक्त केली आहे.

leave a reply