चीनमध्ये कोरोना लॉकडाऊनविरोधात स्थानिक जनतेत तीव्र असंतोष

शांघाय – चीनच्या आघाडीच्या शहरांमध्ये लादल्या जाणार्‍या लॉकडाऊनविरोधात स्थानिक जनतेत तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. आहे. शांघायसह लुडॉंग, चेंगडू, लँगफँग या शहरात स्थानिक जनतेने आपली नाराजी निदर्शने तसेच हल्ल्यांच्या माध्यमातून व्यक्त केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चीनच्या सुरक्षायंत्रणांनी याविरोधात कारवाई सुरू केली असून मार्च महिन्यात दीडशेहून अधिक जणांना अटक केल्याचे सांगण्यात येते. ही बाब चीनच्या सत्ताधारी राजवटीने राबविलेली ‘झीरो कोविड पॉलिसी’ सपशेल अपयशी ठरल्याचे दाखवून देते, असा दावा पाश्‍चिमात्य माध्यमे व विश्‍लेषक करीत आहेत.

स्थानिक जनतेत तीव्र असंतोषगेल्या महिन्यात लुडॉंग शहरात लादलेल्या लॉकडाऊनविरोधात सुन जिआन या २७ वर्षीय विद्यार्थ्याने जोरदार आवाज उठविला. विद्यापीठ परिसरात ‘लिफ्ट द लॉकडाऊन ऑन लुडॉंग’ असा फलकही झळकावला. त्यानंतर सुनला अटक करण्यात आली व विद्यापीठातून काढून टाकण्यात आले. चेंगडूमधील ‘सिच्युआन युनिव्हर्सिटी’मध्ये बहुसंख्य विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनला विरोध केला. विरोध तीव्र झाल्याने विद्यापीठाला लॉकडाऊन मागे घेणे भाग पडल्याचे वृत्त चिनी माध्यमांनी प्रसिद्ध केले.

राजधानी बीजिंगजवळ असणार्‍या लँगफँग शहरात स्थानिक लॉकडाऊनविरोधात रस्त्यावर उतरले. याचे व्हिडिओज् चीनच्या सोशल मीडियावर प्रसिद्ध झाले. मात्र ते तातडीने काढून टाकण्यात आले. शांघाय शहरातील नागरिक लॉकडाऊनविरोधातील संताप आरोग्य कर्मचार्‍यांवर हल्ले चढवून व्यक्त करीत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. शहरात आरोग्य कर्मचार्‍यांवरील हल्ल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यात ‘क्वारंटाईन सेंटर’मधील कर्मचार्‍यांवर झालेल्या हल्ल्यांचाही समावेश आहे. लॉकडाऊनचे नियम मोडणार्‍यांवर पोलीस कारवाई करीत असताना, काहीजण पोलिसांशी झटापट करीत असल्याचे फोटोग्राफ्स तसेच व्हिडिओ प्रसिद्ध झाले आहेत.

स्थानिक जनतेत तीव्र असंतोषचीन हा कम्युनिस्ट राजवटीच्या घट्ट पकडीखाली असणारा व नागरी असंतोष दाबण्यात यशस्वी ठरलेला निर्दय देश म्हणून ओळखला जातो. इंटरनेट व सोशल मीडियावर नियंत्रण ठेऊन ही माध्यमदेखील सत्ताधारी राजवटीच्या हातातच राहतील, याची काळजी चीन घतो. असे असतानाही लॉकडाऊनच्या धोरणावरून सत्ताधार्‍यांविरोधात असणारी नाराजी जगासमोर येणे, ही लक्ष वेधून घेणारे ठरत आहे. ही बाब सत्ताधारी राजवटीची जनतेवर असलेली पकड ढिली होत चालल्याचे संकेत देत असून राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या नेतृत्त्वासाठी ही गोष्ट घातक ठरु शकते, असे संकेत मिळत आहेत.

दरम्यान, कोरोनाविरोधात राबविण्यात आलेल्या धोरणांवरून आता चीनमधील आघाडीच्या कंपन्यांनीही इशारे देण्यास सुरुवात केली आहे. दूरसंचार क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणारी हुवेई व वाहनक्षेत्रातील ‘एक्सपेंग’ या कंपन्यांनी ‘झीरो कोविड पॉलिसी’चा फटका अर्थव्यवस्थेला बसत असल्याचे बजावले आहे. चीनमधील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून लॉकडाऊन उठविले नाही तर उद्योगक्षेत्राला मोठा फटका बसेल, असा इशारा या कंपन्यांच्या वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिला आहे. हा इशारा प्रसिद्ध होत असतानाच शिआन व झेंगझोऊ या आणखी दोन शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.

मात्र आपल्या देशातील कोरोनाची स्थिती, लॉकडाऊनचे परिणाम व त्याला होत असलेला विरोध, हे सारे जगासमोर येऊ नये, यासाठी चीन धडपडत आहे. तरीही ही माहिती जगासमोर आली असून लॉकडाऊनमुळे उपासमार झालेली चीनचे नागरिक आता जीवावर उदार होऊन कम्युनिस्ट पक्षाच्या धोरणांना प्राणपणाने विरोध करू लागल्याचे दिसते आहे.

leave a reply