सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात ४१३ जणांचा बळी

- ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीनंतरही हल्ले सुरू

अमेरिकेकडून सुदानमध्ये मरिन्स घुसविण्याची तयारी

दक्षिण कोरिया, जपानची विमाने जिबौतीमध्ये दाखल

खार्तूम – गेल्या आठवड्याभरापासून सुदानमध्ये सुरू असलेल्या गृहयुद्धात ४१३ जणांचा बळी गेला आहे. तर ३५५१ जण जखमी झाले आहेत. सुदानचे लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी आपण लोकशाही सरकारसाठी तयार असल्याचे जाहीर केले. तसेच मानवतावादी सहाय्यासाठी ७२ तासांची संघर्षबंदी देखील लागू केली. पण यानंतरही राजधानी खार्तूमसह प्रमुख शहरांमध्ये संघर्ष सुरू असून आत्तापर्यंत लाखो जण विस्थापित झाले आहेत. दरम्यान, सुदानमधील आपल्या दूतावासातील कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी अमेरिका लवकरच मरिन्सची तुकडी रवाना करणार असल्याची घोषणा पेंटॅगॉनने केली.

सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात ४१३ जणांचा बळी - ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीनंतरही हल्ले सुरूसुदानचे लष्कर आणि निमलष्करीदलात पेटलेला हा संघर्ष सध्या आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंतेचा विषय ठरत आहे. इंधन आणि सोन्याचे प्रचंड साठे असलेल्या सुदानमधील या गृहयुद्धामागे परकीय शक्ती असल्याचा दावा केला जातो. सुदानच्या लष्कराने यासाठी शेजारी आफ्रिकी देशांवर संशय व्यक्त केला होता. पण सुदानमध्ये लोकशाहीव्यवस्था लागू करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जनरल बुरहान यांच्याविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर कारस्थान आखल्याचा दावा आंतरराष्ट्रीय विश्लेषक करीत आहेत. त्यामुळे हा संघर्ष फक्त आफ्रिकी देशापर्यंत मर्यादित नसून त्याचे आंतरराष्ट्रीय स्तरावर परिणाम उमटू शकतात, याकडे विश्लेषक लक्ष वेधत आहेत.

दोन दिवसांपूर्वी लागू केलेली संघर्षबंदी मोडल्यानंतर लष्करप्रमुख जनरल बुरहान यांनी पुन्हा एकदा ७२ तासांची नवी संघर्षबंदी जाहीर केली. सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात ४१३ जणांचा बळी - ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीनंतरही हल्ले सुरूइस्लामधर्मियांच्या पवित्र सणाच्या निमित्ताने मानवतावादी सहाय्य पोहोचविण्यासाठी ही संघर्षबंदी असल्याचे सुदानच्या लष्कराने जाहीर केले. तरी देखील शुक्रवारी सकाळी राजधानी खार्तूमच्या उत्तरेकडील भागात संघर्ष सुरू असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. निमलष्करीदलाकडून संघर्षबंदीचे उल्लंघन सुरू असल्याचा दावा केला जातो. यानंतरही लष्करप्रमुखांनी आपण सुदानमध्ये लोकशाहीव्यवस्था लागू करण्यासाठी वचनबद्ध असल्याचे म्हटले आहे.

गेल्या आठवड्याभरापासून सुरू असलेल्या या संघर्षात सुदानच्या लष्कराकडे ८० टक्के नियंत्रण असल्याचा दावा याच देशाचे माजी संरक्षण अधिकारी करीत आहेत. सुदानच्या लष्कराला रशियाचे समर्थन असून निमलष्करीदलाचे प्रमुख जनरल दागालो पाश्चिमात्य देशांच्या इशाऱ्यावर काम करीत असल्याचा आरोप होत आहे. सुदानमध्ये भडकलेल्या गृहयुद्धात ४१३ जणांचा बळी - ७२ तासांच्या नव्या संघर्षबंदीनंतरही हल्ले सुरूत्यामुळे सुदानमधील संघर्षाच्या निमित्ताने अमेरिका-रशिया यांच्यातील छुपे युद्ध सुरू असल्याचे दावे आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. या बातम्या समोर येत असताना, अमेरिकेने जिबौतीमध्ये तैनात असलेले आपले मरिन्सचे जवान सुदानमध्ये घुसविण्याची तयारी केली आहे.

खार्तूममधील दूतावासातील आपल्या ७० कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी अमेरिका मरिन्सच्या सहाय्याने लष्करी कारवाई करण्याची शक्यताही माध्यमांनी व्यक्त केली. दक्षिण कोरियन लष्कराची तुकडी आणि विमान देखील जिबौतीमध्ये दाखल झाले आहे. तर जपानने आपल्या नागरिकांच्या सुटकेसाठी प्रवासी विमान रवाना केले. युरोपातील ब्रिटन, जर्मनी या प्रमुख देशांनी सुदानबाबत सर्व पर्यायांवर विचार सुरू असल्याची घोषणा केली असून फ्रान्सने सुदानमध्ये अडकलेल्या आपल्या नागरिकांना घराबाहेर न पडण्याची सूचना केली. त्यामुळे येत्या काळात सुदानमधला रक्तपात अधिक भीषण स्वरूप धारण करण्याची शक्यता बळावल्याचे दिसते.

leave a reply