फेसबुक आणि रिलायन्स जिओमध्ये ४३,५७४ कोटींचा करार

फेसबुक आणि रिलायन्स जिओमध्ये ४३,५७४ कोटींचा करार

नवी दिल्ली – भारतातील तंत्रज्ञान क्षेत्रातील आतापर्यंतचा सर्वात मोठा करार रिलायन्स जिओ आणि फेसबुकमध्ये पार पडला आहे. फेसबुकने रिलायन्स जिओमधील ९.९ टक्के हिस्सा समभागांच्या रूपात खरेदी केला आहे. हा एकूण करार ४३,५७४ कोटी (५.७ अब्ज डॉलर्स) रुपयाचा आहे. या करारामुळे रिलायन्स जिओ पाच सर्वात मोठ्या लिस्टेड कंपनींपैकी एक बनली आहे. या करारानंतर शेअर बाजारात रिलायन्सच्या शेअर्समध्ये मोठी उसळी दिसून आली.

या कराराचा मोठा लाभ रिलायन्स आणि फेसाबुक दोन्ही कंपन्यांना होणार आहे. दोन्ही कंपन्या एकमेकांच्या साथीने भारतातील आपला व्यवसाय विस्तारू शकणार आहेत. तसेच रिलायन्स समूहाने पुढील वर्षापर्यंत कर्ज मुक्त होण्याचे लक्ष ठेवले आहे. या करारामुळे रिलायन्सवरील कर्जाचा भार कमी होणार असल्याचे सांगितले जाते. तसेच जिओ प्लॅटफॉर्मचाही विस्तार होणार आहे.

या करारासह जिओ फ्लॅटफॉर्म, रिलायन्स रिटेल लिमिटेड आणि फेसबुकच्या व्हॉट्सअपमध्येही एक करार पार पडला आहे. यानुसार रिलायन्स रिटेल आपला इ-कॉमर्स व्यवसाय व्हॉट्सअपच्या मदतीने जिओमार्टच्या प्लँटफॉर्मच्या माध्यमातून विस्तारण्याचे लक्ष ठेवण्यात आले आहे. व्हॉट्सअपचे भारतात ४० कोटी युजर्स आहेत. व्हॉट्सअपचे डिझिटल पेमेंट ऍप असले तरी भारतात मोठी कमाई करण्यात व्हॉट्सअप अयशस्वी ठरले होते. आता जिओमार्टला व्हॉट्सअपच्या सहकार्याने व्यवसाय विस्तारताना दोन्ही कंपन्यांना लाभ होईल, असा दावा केला जातो.

हा करार देशामध्ये डिजिटल सेवांना पुढे नेण्यास मदत करील, असे अंबानी यांनी सांगितले. तसेच दोन्ही कंपन्या मिळून भारतीय डिजिटल अर्थव्यवस्था आणखी मजबूत करतील, असा विश्वास अंबानी यांनी व्यक्त केला. फेसबुक आणि रिलायन्स जिओमध्ये झालेल्या या कराराचे भारतीय उद्योगजगतात स्वागत होत आहे.

leave a reply