कोरोनाव्हायरसनंतर ‘उपासमारीची साथ’ थैमान घालणार

– संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘डब्ल्यूएफपी’च्या प्रमुखांचा इशारा

न्यूयॉर्क – “कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे आज जगावरील उपासमारीचे संकट अधिक भयावह बनले आहे. वेळीच पावले उचलली नाहीत तर हे उपासमारीचे संकट आक्राळविक्राळ रूप धारण करील. जगभरात कोरोनाव्हायरसने जेवढे बळी घेतले नाहीत, त्याहून अधिक बळी या ‘उपासमारीच्या साथी’मध्ये जातील”, असा थरकाप भरविणारा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या ‘वर्ल्ड फूड प्रोग्रॅम’चे (डब्ल्यूएफपी) प्रमुख डेव्हिड बेस्ले यांनी दिला. कोरोनाव्हायरसची साथ ही येत्या काळात जगावर कोसळणाऱ्या संकटांची मालिकाच घेऊन आली आहे, असे ‘डब्ल्यूएफपी’चे प्रमुख बेल्से यांनी राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत बजावले.

कोरोनाव्हायरसमुळे जगभरातील १८० हून अधिक देशांमध्ये लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. याचा थेट परिणाम या देशांच्या अर्थव्यवस्थेवर झाला असून आर्थिक मंदीचे संकट या देशातील गरिबांना पिळून काढणारे असेल, असे बेस्ले यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सांगितले. या लॉकडाउनमुळे जगभरातील बेरोजगारी प्रचंड वाढली असून रोजंदारीवर काम करणाऱ्यांचा रोजगार या साथीने हिरावून घेतला असल्याचे बेस्ले यांनी निदर्शनास आणून दिले. यामुळे जगभरात भयंकर परिस्थिती निर्माण झाली असल्याची जाणीव बेस्ले यांनी करुन दिली.

कोरोनाव्हायरसच्या साथीने थैमान घालण्याच्या आधीपासून जगभरातील ८२ कोटी जनता अर्धपोटी राहत होती. यापैकी तेरा कोटी पन्नास लाख जणांच्या अन्नाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. यातील दहा कोटी जणांना ‘डब्ल्यूएफपी’कडून अन्न पुरविले जाते. तरीही जगभरातील तीन कोटी जनतेला उपासमारी सहन कारावी लागत होती. पण आत्ता या कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे उपासमारीच्या संकटाचा सामना करणाऱ्यांची संख्या दुपटीने वाढणार असल्याची भयानक बाब बेस्ले यांनी मांडली आहे.

कोरोनानंतर जगावर कोसळणाऱ्या या उपासमारीच्या संकटाचा सामना करण्यासाठी वेळीच उपाययोजना करणे आवश्यक ठरेल. अन्यथा कोरोनाच्या विषाणूपेक्षाही लॉकडाउनमुळे निर्माण होणाऱ्या उपासमारीच्या साथीत अधिक जणांचा बळी जाईल, असा इशारा बेस्ले यांनी दिला आहे. दरम्यान, ‘डब्ल्यूएफपी’चे अध्यक्ष असलेले डेव्हिड बेस्ले यांना कोरोनाव्हायरसची लागण झाली आहे.

leave a reply